Maharashtra Rain Alert : गेल्या ऑगस्ट महिन्यात सुट्टीवर गेलेला मान्सून सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. या चालू महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली. मात्र म्हणावा तसा पाऊस सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील पडला नाही.
यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढतच होती. मान्सूनच्या तीन महिन्यांपैकी फक्त एका महिन्यात चांगला पाऊस पडला होता, उर्वरित दोन महिने महाराष्ट्रात हवामान कोरडेच होते. यामुळे साहजिकच संपूर्ण खरीप हंगाम आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर मधील परतीच्या पावसावर अवलंबून आहे.
सप्टेंबर आणि पुढल्या महिन्यात चांगला पाऊस झाला तरच या हंगामातून थोडंफार उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरात येणार आहे. यामुळे शेतकरी बांधव मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी संपली आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
कारण की श्रीकृष्ण जन्माष्टमी अर्थातच सहा सप्टेंबर पासून राज्यात पावसाचा जोर वाढायला सुरुवात झाली आहे. सहा सप्टेंबर, 7 सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर रोजी राज्यातील वेगवेगळ्या भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. काल उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही खूपच जोराचा पाऊस झाला आहे.
पावसामुळे अनेक नदीकाठी वसलेल्या गावात पाणी शिरले आहे. अनेक नद्यांना पूर आले आहेत. मात्र सध्या कोसळत असलेला हा पाऊस शेतकऱ्यांसाठी चिंतेचा नसून तर चिंता मिटवणारा आहे. कारण की हाच पाऊस आता या खरीप हंगामासोबतच रब्बी हंगामाला तारण्याचे काम करणार आहे.
यामुळे सध्या बळीराजा सुखावला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मनसोक्त पाऊस बरसत असून भारतीय हवामान विभागाने आगामी दोन दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात 14 सप्टेंबर नंतर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने येत्या 48 तासात जोरदार पावसाचा अंदाज बांधला असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी येल्लो अलर्ट जारी केला आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर काही ठिकाणी अतीमुसळधार पाऊस पडणार असे देखील हवामान विभागाने यावेळी स्पष्ट केले आहे.