Maharashtra Rain : भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात 28 तारखेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. विशेष म्हणजे काल अर्थातच 26 नोव्हेंबर रोजी राज्यातील छत्रपती संभाजी नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
दरम्यान भारतीय हवामान विभागाचा हा अंदाज आता खरा ठरला आहे. मुंबई, पुणेसह राज्यातील विविध भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. काही भागात तर मुसळधार पावसामुळे पार दानाफान झाली होती.
नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी भागात गारपीट देखील झाली. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले असल्याने सध्या राज्यभरातील बळीराजा अडचणीत आला आहे.
या अवकाळी पावसाचा फळ उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा फटका बसला आहे. तथापि, रब्बी हंगामातील पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरू शकतो असा अंदाज आहे. एकंदरीत पावसाळ्यात रुसलेला पाऊस आता ऐन हिवाळ्यात तांडव करत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांसहित सर्वसामान्यांच्या माध्यमातून ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसासह गारपीट होण्याचे नेमके कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. भारतीय हवामान विभागाने ऐन नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडण्याचे खरे कारण सांगितले आहे.
काय म्हणतंय हवामान विभाग?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये चक्रीवादळ स्वरूपात वारे वाहत आहेत. त्यामुळे मुंबई व किनारपट्टी लगतच्या भागांमध्ये पावसाचे ढग तयार झाले आहेत.
हेच कारण आहे की सध्या नोव्हेंबर महिना सुरू असतानाही महाराष्ट्रात पाऊस पाहायला मिळत आहे. हवामानातील या बदलामुळे राज्यात सध्या अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून ऐन हिवाळ्यात वरूनराजा महाराष्ट्रावर मेहेरबान झाला आहे.
विशेष बाब अशी की किनारपट्टी लगत वाहणारे हे वारे महाराष्ट्राच्या दिशेने पुढे जात आहेत. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्याच्या किनारपट्टी भागातून हा पाऊस पुढे सरकणार असे हवामान खात्याने सांगितली आहे. यामुळे आगामी काही दिवस महाराष्ट्रात अवकाळी पाऊस असाच बरसत राहणार असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता डिसेंबर महिन्यातही अवकाळी पाऊस पडणार का? हा सवाल आहे.
परंतु भारतीय हवामान विभागाने याबाबत अद्याप कोणतीच माहिती दिलेली नाही. पण आगामी काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नोव्हेंबर अखेरीस पावसाचे वातावरण निवळणार की डिसेंबरमध्येही पाऊस सुरू राहणार हा मोठा प्रश्न कायम आहे.