Maharashtra Rain : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर या वर्षी पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी खूपच मारक ठरला आहे. मान्सूनच्या अगदी सुरुवातीला म्हणजे जून महिन्यात यावर्षी खूपच कमी पाऊस पडला.
जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे खरीप हंगामातील पीक पेरणी प्रभावीत झाली. मात्र जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे राज्यातील बहुतांशी भागातील पिकांना मोठा दिलासा मिळाला. पण ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा पावसाने उघडीप दिली.
संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला. त्यामुळे खरीपातील पिके पुन्हा एकदा संकटात आली होती. यानंतर आता सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील बहुतांशी भागात चांगला पाऊस झाला आहे. सात सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान राज्यातील बहुतांशी भागात पाऊस झाला आहे.
या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी देखील झाली. अशातच मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे आहेत. पिकांसाठी आता जोरदार पावसाची गरज आहे.
अशातच भारतीय हवामान विभागाने एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. यानुसार आज आणि उद्या म्हणजेच 14 आणि 15 सप्टेंबरला राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडणार असा अंदाज आहे. यामुळे यंदाचा बैलपोळा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो असे सांगितले जात आहे.
आज 14 सप्टेंबर अर्थातच दर्श पिठोरी अमावस्या, या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात बैलपोळ्याचा सण साजरा केला जाणार आहे. या बैलपोळ्याच्या सणाला मात्र यंदा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे हा सण भर पावसात साजरा करावा लागू शकतो असे सांगितले जात आहे.
यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आज 14 सप्टेंबरला राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ विभागातील पूर्व भागातील गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांमध्ये आज अनेक ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या तिन्ही जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच आज बुलडाणा, वाशीम, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार असा अंदाज आहे.
तसेच आज खानदेशातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यातही ठिकठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस होणार आणि मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. याशिवाय उद्या अर्थातच 15 सप्टेंबरला राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच उद्या उर्वरित विदर्भामध्ये विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली तसेच खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातही ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
एकंदरीत आज बैलपोळ्याच्या मुहूर्तावर राज्यातील बहुतांशी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय उद्या देखील पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. यामुळे आता हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.