Maharashtra Rain : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अवकाळी पावसाचा जोर थोडासा कमी झाला आहे. मात्र राज्यातील ढगाळ हवामानाचे आणि अवकाळी पावसाच सावट अजूनही पूर्णपणे दूर झालेले नाही. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मुसळधार पाऊस झाला.
काही भागात अक्षरशः गारपीट झाली आणि यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक या अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाले आहे.
शेती पिकांवर कीटकांचा आणि विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे अवकाळी पाऊस केव्हा विश्रांती घेणार आणि जोरदार थंडीला केव्हा सुरुवात होणार हा सवाल शेतकरी बांधव उपस्थित करत आहेत.
अशातच आता हवामान खात्याने पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचॉंग या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात आगामी काही दिवस पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार आहे.
आज अर्थातच 5 डिसेंबर 2023 रोजी राज्यातील मराठवाडा आणि विभागातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याच्या माध्यमातून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. IMD ने पूर्व विदर्भात विजांसह पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे.
पूर्व विदर्भातील त्या संबंधित जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली गेली आहे.
हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, नैऋत्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागरात मिचॉंग चक्रीवादळ सुद्धा तयार झाले आहे.
यामुळे पूर्व किनारपट्टी व लगतच्या राज्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात देखील झाली आहे. अनेक राज्यात वादळी पाऊस झाला आहे आणि यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
काही ठिकाणी पूरस्थिती तयार झाली आहे. यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून शासनाच्या माध्यमातून योग्य ते प्रयत्न केले जात आहेत. काही भागातील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही मार्गांवरील विमान सेवा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.
दरम्यान, या चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसून येत आहे. आपल्याकडे अनेक भागात ढगाळ हवामान तयार झाले आहे. तसेच आज विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात विजांसह पाऊस पडणार असा अंदाज आहे. या तिन्ही जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
तसेच मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाची आणि पशुधनाची काळजी घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.