Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात आणखी तीन दिवस अवकाळी पाऊस कायम राहणार आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 20 एप्रिल पर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काही हवामान तज्ञांनी राज्यात पुढील पाच ते सात दिवस मराठवाडा आणि विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे.
यामुळे मात्र राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. एकीकडे राज्यात उष्णतेची लाट येत आहे तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे.
उकाड्यामुळे सामान्य नागरिक बेजार झाले आहेत. विशेष म्हणजे आगामी काही दिवस राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. अर्थातच सध्या राज्यात ऊन, पावसाचा खेळ सुरू आहे.
कुठं पडणार अवकाळी पाऊस
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अरबी समुद्रातून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आद्रता युक्त उष्ण वारे वाहत आहेत. तसेच बंगालच्या उपसागरातून दरबात आद्रता युक्त उष्ण वारे दाखल होत आहेत.
या आद्रता युक्त उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये उकाडा वाढला आहे तर याच वाऱ्यांमुळे अवकाळी पाऊस देखील होत आहे. या उष्ण वाऱ्यांमुळे आगामी पाच ते सात दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
IMD ने आज अर्थातच गुरुवारी राज्यातील मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर आणि मराठवाडा विभागातील धाराशिव, लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार असा अंदाज दिला आहे.
तसेच मराठवाडा विभागातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
एवढेच नाही तर उद्या अर्थातच शुक्रवारी सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या सरी पडतील असे यावेळी आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.
तसेच शनिवारी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. यामुळे या सदर भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन जाणकार लोकांच्या माध्यमातून केले जात आहे.
तसेच आगामी काही दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दिवसा कडक ऊन असताना खूपच आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावे अन्यथा घरात थांबावे असे आवाहन केले जात आहे.