Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी उन्हाचे चटके बसत आहेत तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस बरसत आहे. विशेष म्हणजे राज्यात 25 मे पर्यंत अनेक ठिकाणी तापमान 40° पार जाणार आहे. दिवसाचे कमाल तापमान चाळिशी पार जाणार असल्याने काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात सायंकाळी ढगाळ हवामान तयार होईल आणि अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज आहे.
पुढील काही दिवस राज्यात वादळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. मराठवाडा अन विदर्भात देखील पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तसेच, 25 मे पर्यंत संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहमदनगर अशा २४ जिल्ह्यांत दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे.
या भागात कमाल तापमान 40 ते 44 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवले जाईल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. पण, संपूर्ण महाराष्ट्रात 25 मे पर्यंत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
आज 23 मे 2024 आणि उद्या 24 मे 2024 ला राज्यातील मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मराठवाडा विभागातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या ८ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता अधिक जाणवत असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.
एकंदरीत राज्यातील दक्षिण भागांमध्ये आज आणि उद्या पावसाचा अंदाज आहे. मात्र, यानंतर राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील अवकाळीचे ढग दूर होणार आहेत. म्हणजेच विदर्भ आणि मराठवाडा विभागात आता अवकाळी पाऊस विश्रांती देणार आहे.
तथापि राज्यातील खानदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये 24 मे नंतरही ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाचे वातावरण पाहायला मिळू शकते असा अंदाज समोर आला आहे. दुसरीकडे मान्सूनसाठी सध्या पोषक परिस्थिती तयार झाली असून आगामी काळात मानसून केरळमध्ये दाखल होणार आहे.
यावर्षी केरळमध्ये मान्सूनचे 28 मे ते 3 जून या कालावधीत आगमन होण्याची दाट शक्यता आहे. तसेच आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी मान्सूनचे आगमन होऊ शकते असे बोलले जात आहे.
तथापि मे महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रात मान्सून आगमन कधी होणार या संदर्भात हवामान तज्ञांच्या माध्यमातून योग्य माहिती समोर येणार आहे. मात्र असे असले तरी सध्याची मान्सून साठीची अनुकूल परिस्थिती पाहता यावर्षी वेळेतच महाराष्ट्रात मान्सून आगमन होणार असल्याचा आशावाद तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.