Maharashtra Rain : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला जोरदार पाऊस आता विश्रांती घेणार असे चित्र तयार होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक भागात अतिवृष्टी झाली त्यामुळे शेती पिकांना याचा फटका बसला आहे.
अनेक भागातील जमिनी पुराच्या पाण्याने खरडून निघाल्या आहेत. मात्र काही भागात या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना नवीन जीवदान मिळाले आहे. अशातच मात्र हवामान विभागाकडून एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता राज्यातून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
कमी दाबाचे क्षेत्र निवळल्याने आता पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज आहे. पुढील दोन आठवडे राज्यात पावसाचा जोर कमी राहणार असं मत भारतीय हवामान विभागाने व्यक्त केले असून ऑगस्टमध्ये कमी पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे एक जून ते 27 जुलै दरम्यानच्या कालावधीमध्ये राज्यात सरासरीपेक्षा १३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र आता ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडणार असा अंदाज असल्याने याचा विपरीत परिणाम शेती पिकांवर होऊ शकतो.
दरम्यान आज 29 जुलै रोजी भारतीय हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा, विदर्भ विभागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला असून या पार्श्वभूमीवर या संबंधित विभागातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी झाला आहे.
आज राज्यातील कोणत्याच जिल्ह्याला ऑरेंज किंवा रेड अलर्ट देण्यात आलेला नाही. आज केवळ येलो अलर्ट देण्यात आला आहे. एकंदरीत आजपासूनच राज्यात पावसाचा जोर थोडा कमी होणार असल्याचे चित्र आहे.
आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तसेच विदर्भ विभागातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.