Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सातत्याने भाग बदलत मोसमी पाऊस होत आहे. मोसमी पावसामुळे राज्यातील वातावरण आल्हाददायक बनले आहे. खरंतर, राज्यात 23 जून पर्यंत पावसाचा एक शिंतोडा देखील नव्हता. यामुळे बळीराजा पूर्णपणे धास्तवला होता. म्हणून शेतकरी बांधव पंढरीच्या विठुरायाकडे पावसासाठी साकडं घालत होते.
विठुरायाने देखील शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकले आणि राज्यात पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. आज आषाढी एकादशी, यामुळे पंढरीत लाखो वारकऱ्यांचा जमावडा आहे. राज्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी देखील अजून काही भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. पेरणीयोग्य पावसाची अजूनही वाट पाहिली जात आहे.
यामुळे वारकरी नको पांडुरंगा मला सोन्या-चांदीचे दाण रे..! फक्त भिजव माझं हे तहानलेलं रान रे..! असे साकडे विठुरायाला घालत आहेत. दरम्यान वारकऱ्यांच्या नवसाला विठुराया पावला आहे. कारण की आज राज्यातील 13 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने तसा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता कायम राहणार आहे. विशेष बाब अशी की उर्वरित राज्यात देखील हलका ते सामान्य पाऊस पडणार आहे.
आज २९ जूनला राज्यातील तेरा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये कोकणात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
या पार्श्वभूमीवर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील या संबंधित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे. निश्चितच ऑरेंज अलर्ट जारी झाला असल्याने शेतकरी बांधवांनी शेतीची कामे करताना विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे. सामान्य जनतेने देखील बाहेर पडताना विशेष सावधानता बाळगावी असे आवाहन केले जात आहे.
याव्यतिरिक्त, खानदेश मधील नंदूरबार, जळगाव या जिल्ह्यातही आज हलका पाऊस होणार असा अंदाज आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सिंधुदुर्गसह राजधानी मुंबईतही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असल्याचे आय एम डी ने आपल्या सुधारित बुलेटिनमध्ये स्पष्ट केले आहे.
कोणत्या 13 जिल्ह्यात पडणार पाऊस !
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 29 जून रोजी राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई, सिंधुदुर्ग, नंदूरबार, जळगाव, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता असून यासाठी संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी झाला आहे.