Maharashtra Rain : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई तसेच मुंबई उपनगरात देखील पावसाचा हाहाकार सुरूच आहे. मुंबईमध्ये सलग गेली तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे सखल भागात पाणी साचले तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
विशेष म्हणजे आज देखील राजधानी मुंबईत पावसाची शक्यता आहे. अधून मधून जोरदार वारा देखील वाहू शकतो असा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने आज मुंबईमध्ये पावसाची शक्यता वर्तवली असून मुंबईला आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मात्र, पुणे वेधशाळेने पावसाबाबत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार येत्या 48 तासानंतर राज्यात पावसाचा जोर हळूहळू कमी होणार आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन आठवडे राज्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी राहणार आहे. जुलै महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला आहे मात्र आता ऑगस्टमध्ये अपेक्षित असा पाऊस पडणार नसल्याचे सांगितले जात आहे.
साहजिकच यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातील पिकांवर ऑगस्ट महिन्यात जर चांगला पाऊस झाला नाही तर विपरीत परिणाम होऊ शकतो. दरम्यान आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार एक जून 2023 ते 23 जुलै 2023 दरम्यान सरासरीच्या तुलनेत 13 टक्के अधिक पाऊस पडला आहे.
म्हणजेच आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान आता हवामान विभागाने पुढील दोन ते तीन तासात राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भ विभागात पुढील दोन ते तीन तासात जोरदार पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
यासोबतच मुंबईसह कोकणातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या दोन-तीन तासात मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता असल्याने तेथील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.