Maharashtra Rain : फेब्रुवारी महिन्याचा पहिला पंधरवाडा संपत आला आहे. अर्थातच येत्या काही दिवसात आता उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे. यामुळे राज्यातील थंडीचा जोर कमी होऊ लागला आहे. आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे.
खरंतर या वर्षी थंडीची तीव्रता खूपच कमी पाहायला मिळाली. गेल्यावर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस झाला नाही, शिवाय हिवाळ्यात चांगली थंडी पडली नाही. यामुळे 2024 मधला मान्सून कसा राहणार याकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष आहे.
दरम्यान अनेक जागतिक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी प्रशांत महासागरातील एल निनोची परिस्थिती येत्या दोन महिन्यात पूर्णपणे निवळणार अशी आशा व्यक्त केली आहे.
अर्थातच येत्या दोन महिन्यात एल निनोचा प्रभाव हळूहळू कमी होणार आहे. असे झाल्यास यंदाच्या मान्सून काळात चांगला पाऊस होणार असा अंदाज आहे. विशेष म्हणजे देशातील स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देखील यावर्षी सामान्य पावसाची शक्यता वर्तवली आहे.
निश्चितच असे झाले तर महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र असे असले तरी सध्याचा रब्बी हंगाम हा अवकाळी पावसामुळे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. कारण की महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.
काल अर्थातच शनिवारी विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार अवकाळी पावसासह गारपीटीची हजेरी लागली आहे. वर्धा जिल्ह्यातील काही भागात गारपिट झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मराठवाड्यात देखील अवकाळी पाऊस बरसला आहे.
हवामान खात्याने आधीच 9 फेब्रुवारीपासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज व्यक्त केला होता. यानुसार आता मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. विशेष बाब अशी की 14 तारखेपर्यंत अवकाळी पावसाचे तांडव सुरूच राहणार असा अंदाज आहे.
आगामी दोन ते तीन दिवस राज्यातील मराठवाडा, खानदेशातील काही भाग आणि विदर्भातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर येथे हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण, अकोला, अमरावती, वर्धा तसेच नागपुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हजेरी लावणार असे आय एम डी ने स्पष्ट केले आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी क्षेत्रातील जाणकारांनी आणि हवामान तज्ञांनी केले आहे.