Maharashtra Rain : आज दिवाळी आणि लक्ष्मीपूजनचा सण आहे. यामुळे सर्वत्र मोठे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. आज बाजारात अलंकार खरेदीसाठी, नवीन वाहन खरेदीसाठी मोठी गर्दी राहणार आहे.
तथापि, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असल्याने आज देखील राज्यात पाऊस पडणार कसा सवाल सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्ताला महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार, अवकाळी पाऊस हजेरी लावणार का ? याबाबत सविस्तर अशी माहिती दिली आहे.
IMD ने आपला नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. खरंतर, राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे.
राजधानी मुंबई, ठाणे, पालघर या भागातही अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस बरसत आहे. हे कमी दाब क्षेत्र राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार करत आहे.
विशेष म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ विभागात देखील काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे. पण या अवकाळी पावसामुळे शेती पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. या अवकाळी पावसाचा काढणीसाठी तयार झालेल्या धान पिकाला मोठा फटका बसला आहे.
कोकणात सध्या धान पिकाची हार्वेस्टिंग सुरू आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात देखील धान पिकाची तसेच सोयाबीन, कापूस यांसारख्या पिकांची काढणी प्रगतीपथावर आहे. दरम्यान या हार्वेस्टिंगसाठी तयार झालेल्या शेती पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तथापि या अवकाळी पावसाचा आगामी रब्बी हंगामासाठी फायदा होईल असा आशावाद ही व्यक्त होत आहे. अशातच हवामान विभागाने आज अर्थातच 12 नोव्हेंबर रोजी राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडे राहणार अशी माहिती दिली आहे.
अर्थातच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महाराष्ट्रात पावसाची हजेरी राहणार नाही. आज राज्यात ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता IMD कडून वर्तवण्यात आली आहे. पण राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. राज्यात गारठा कमी झाला असून, गुलाबी थंडीची अजूनही प्रतीक्षाच आहे.