Maharashtra Rain : गेल्या महिन्यात महाराष्ट्रात चांगलाचं जोरदार पाऊस झाला. काही भागात तर गारपीट देखील झाली. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व आजूबाजूच्या परिसरात गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली.
खरे तर मान्सून काळात महाराष्ट्राकडे पाठ फिरवलेला पाऊस मान्सूनोत्तर मनसोक्त बरसला. यामुळे मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
प्रामुख्याने ज्या भागात गारपीट झाली तेथील शेती पिकांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. ज्या भागात गारपीट झाली तेथे द्राक्षाच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे गारपिटीने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान देखील केले आहे.
राज्यात या डिसेंबर महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसानेचं झाली. आता मात्र गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर जवळपास पूर्णपणे ओसरला आहे. राज्यातील काही भागात ढगाळ हवामानाची नोंद केली गेली आहे.
मात्र अवकाळी पाऊस कुठेच बरसलेला नाही. याउलट राज्यात आता हवामान पूर्वपदावर आले असून काही ठिकाणी कडाक्याच्या थंडीला सुरुवातही झाली आहे. राज्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून गुलाबी थंडीची चाहूल पाहायला मिळत आहे.
गुलाबी थंडीमुळे राज्यातील वातावरणात मोठा गारवा पाहायला मिळत आहे आणि सर्वत्र अल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने आगामी पाच दिवस राज्यात हवामान कसे राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
खरे तर सध्या देशात दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे तर उत्तरेकडे थंडीची तीव्रता हळूहळू वाढत आहे. राज्यातही काही विभागात कडाक्याची थंडी पडू लागली आहे. दुसरीकडे केरळमध्ये काही भागात ढगांच्या गडगडाट आणि विजांसह काही भागात पावसाचा अंदाज आहे.
राज्यात काल आणि आज मात्र हवामान प्रामुख्याने कोरडे पाहायला मिळाले. आज दुपारी काही ठिकाणी कडक ऊनही पडले होते. दरम्यान चक्रीवादळ पूर्णपणे निवळल्यानंतर आता महाराष्ट्रात कुठेच पावसाची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे.
आगामी पाच दिवस महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहिल असा अंदाज आहे. राज्यात थंडीला सुरुवात झाली आहे. पण जोरदार कडाक्याच्या थंडीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते असे हवामान खात्याच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे.
एकूणच काय की आगामी पाच दिवस महाराष्ट्रात कुठेच अवकाळी पावसाची शक्यता नाहीये. निश्चितच शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी राहणार असून थंडीचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता असल्याने रब्बी हंगामातील पिकांसाठी हे वातावरण पोषक ठरू शकते.