राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला, ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस ! मुंबई, पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात कसं राहणार हवामान? वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात काही काळ पावसाने ओढ दिल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात मान्सून सक्रिय झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा आता जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. काल अर्थातच सोमवारी कोकणात काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे.

उर्वरित राज्यात मात्र रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान आज पासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे निश्चितच जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. खरंतर जून महिन्याचे तीन आठवडे कोरडे गेलेत, फक्त शेवटच्या आठवड्यात पाऊस झाला.

यानंतर जुलैमध्ये जोरदार पाऊस होणार अशी आशा होती. मात्र जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत चांगलीच भर पडली आहे. वास्तविक गेल्या अनेक दिवसांपासून एल निनोमुळे यंदा भारतात कमी पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला जात आहे. भारतीय हवामान विभागाने मात्र एलनिनोमुळे यावर्षी कमी पाऊस पडणार नाही हे स्पष्ट केले आहे.

परंतु यंदा अगदी सुरुवातीपासूनच मान्सून कमकुवत असल्याने आणि अजूनही महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात जोरदार पाऊस पाहायला मिळत नसल्याने एलनिनोमुळे यंदा खरच दुष्काळ पडणार की काय ? अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

अशातच राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.  ती म्हणजे आजपासून पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने याबाबत सविस्तर अशी माहिती दिली आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर. 

कुठं पडणार पाऊस?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह उत्तर कोकणातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच दक्षिण कोकणातील रायगड आणि रत्नागिरीमध्ये शुक्रवारपर्यंत म्हणजे 21 जुलैपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे. विशेष म्हणजे रायगडमध्ये उद्या अर्थातच बुधवारी काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबईत उद्या जोरदार पाऊस होणार असा अंदाज असून उद्यासाठी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर आणि ठाणे जिल्ह्यात उद्या आणि परवा जोरदार पावसाची शक्यता असून दोन्ही दिवशी या दोन्ही जिल्ह्यांसाठी IMD ने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

विशेष म्हणजे यानंतरही कोकणात पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे. यासोबतच पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात आगामी काही दिवस पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार पर्यंत पुण्याला आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. IMD ने सांगितल्याप्रमाणे, विदर्भ विभागात पुढील पाच दिवस सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होणार अशी शक्यता आहे.

यात भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता असून आज या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजी नगर या दोन जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उर्वरित मराठवाड्यात मात्र हलका ते मध्यम पाऊस होणार असा अंदाज आहे. एकंदरीत मराठवाड्यात अजूनही जोरदार पावसासाठी वाटच पहावी लागणार असल्याचे चित्र आहे.

यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. खरंतर मराठवाडा विभागात आणि उत्तर महाराष्ट्रात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे तेथील खरीप हंगामातील पिकांना जोरदार पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र तूर्तास तरी या विभागात जोरदार पाऊस होणार नाही असा अंदाज आहे, यामुळे या विभागातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार आहे. 

Leave a Comment