Maharashtra Rain : राज्यात काल कोंकणसह घाटमाथ्यावर तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला आहे. जोरदार पावसाला सुरुवात झाली असल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान कालच्या पावसाने शेत शिवारात शेतकऱ्यांची धावपळ वाढवली आहे. ज्या भागात पेरणी खोळंबली आहे त्या भागात आता पेरणीला वेग येणार असे चित्र आहे. तरीही पेरणी किमान 85 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच करावी असे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे.
विशेष म्हणजे आजही राज्यातील कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात मोसमी पावसाचा जोर वाढण्यासाठी पोषक हवामान तयार झाले आहे.
आज सहा जुलै रोजी भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता IMD कडून वर्तवण्यात आली आहे.
आज राज्यातील जवळपास 29 जिल्ह्यात पाऊस पडणारा अंदाज आहे. यात काही जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे तर काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यात पडणार अतिमुसळधार पाऊस
आज राज्यातील रायगड आणि रत्नागिरी या दक्षिण कोकणातील दोन जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीने या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.
या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस
पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा !
नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.