Maharashtra Rain July Alert : जून महिन्यात उशिराने मान्सूनचे आगमन झाले यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात होती. यंदा पाऊसमान चांगला राहणार नाही असा अंदाज अनेक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खाजगी संस्थांनी देखील व्यक्त केला होता. यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना भीती वाटणे स्वाभाविक होते.
विशेष बाब म्हणजे जून महिन्यात मान्सून उशिराने दाखल झाला शिवाय मान्सून दाखल झाल्यानंतरही समाधानकारक पाऊस पडला नाही. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निश्चितच काही भागात जोरदार पाऊस झाला मात्र हा पाऊस सर्वदूर नव्हता.
अशा परिस्थितीत जुलै महिन्यात शेतकऱ्यांना जोरदार पावसाची गरज होती. जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी ओढे नाले वाहतील असा पाऊस पडला मात्र बहुतांंची भाग हा कोरडाच राहिला. या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात कधी पावसाची उघडीप, तर कधी जोरदार पाऊस अस संमिश्र हवामान पाहायला मिळाल.
मात्र आता या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात बहुतांशी भागात जोरदार पाऊस होत आहे. काही भागात अतिवृष्टी देखील झाली आहे. या जोरदार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील काही नद्यांमधील पाण्याची पातळी वाढली आहे.
तर काही नद्यांना पूर आला आहे. राज्यातील काही धरणाच्या जलाशयात वाढ झाली आहे. खातरजमा म्हणून काही धरणाची दरवाजे खोलण्यात आली आहेत. अशातच हवामान विभागाने पावसाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दक्षिण कोकणातील जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज आहे.
या जिल्ह्यात अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असे IMD ने आपल्या अंदाजात म्हटले आहे. तसेच आज उत्तर कोकणातील ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातही पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज आहे.
अमरावती, गडचिरोली, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे. विशेष बाब अशी की, गेल्या काही दिवसांपासून ज्या उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडत नाहीये त्या उत्तर महाराष्ट्रात आज तुफान पाऊस पडणार अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर झाला आहे.
तसेच आज मराठवाड्यात देखील विजांच्या कडकटांसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाड्यात मात्र सर्वदूर पाऊस होणार नाही परंतु तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे.
आज पुण्यात जोरदार पावसाची शक्यता असून जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टी होणार म्हणून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर तसेच साताऱ्यातील घाट माथ्यावरही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच आज मुंबईसाठी देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.
निश्चितच आगामी पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचे मत आय एम डी कडून व्यक्त झाली असल्याने जोरदार पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाला यामुळे दिलासा मिळणार असे चित्र आहे. दरम्यान जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता आणि काही भागात अतिवृष्टी होणार असा अंदाज असल्याने नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.