Maharashtra Rain : मान्सूनचा पहिला महिना अर्थात जून महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात पाऊस पडला नाही. कोकण आणि घाटमाथ्यावर जून महिन्यात पाऊस झाला मात्र उर्वरित महाराष्ट्रात पाऊस पाहायला मिळाला नाही. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाची जोरदार कमबॅक एन्ट्री झाली.
एक जुलै ते सहा जुलै राज्यातील बहुतांशी भागात जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. मात्र येत्या दोन दिवसात राज्यात पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज आहे. कोकण आणि घाटमाथ्यावरील पावसाचा जोर येत्या दोन दिवसात कमी होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आज मात्र राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली असून या संबंधित जिल्हांसाठी येलो अलर्ट आयएमडीने जारी केला आहे.
IMD म्हणतंय की, मॉन्सूनचा आस हा दक्षिणेकडे आला आहे. सोबतच किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे.
या पोषक हवामानामुळे आज कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होणार असा अंदाज आहे. याशिवाय, आज राज्यातील विदर्भ विभागात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उर्वरित राज्यातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आता आपण कोणत्या जिल्ह्यासाठी भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे, म्हणजे कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे, याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर कोकणातील पालघर आणि दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
यासोबतच विदर्भ विभागातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांसाठी देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे.