Maharashtra Rain : ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नुकताच एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. या हवामान अंदाजात पंजाबरावांनी महाराष्ट्रात आणखी किती दिवस अवकाळी पावसाचे सावट कायम राहणार आणि कधीपासून हवामान कोरडे होणार या संदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे.
विशेष म्हणजे आता राज्यातील कोणत्या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे याबाबत देखील त्यांनी आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.
कुठे बरसणार अवकाळी पाऊस ?
खरंतर, आज भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात वादळी पावसाची शक्यता आहे.
एवढेच नाही तर भारतीय हवामान खात्याने आज मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार अशी शक्यता व्यक्त केली आहे.
आय एम डी ने आगामी काही दिवस वादळी पावसाची शक्यता कायम राहणार असे म्हटले असून पुढील काही दिवस कोकणात उष्णतेची लाट कायम राहू शकते असा अंदाज व्यक्त केला आहे.
दुसरीकडे पंजाबरावांनी देखील आजपासून तीन दिवस अर्थातच 27 28 आणि 29 एप्रिल 2024 पर्यंत महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार 27 ते 29 एप्रिल दरम्यान राज्यातील उत्तर महाराष्ट्र विभागात मराठवाडा विभागात आणि विदर्भ विभागातील पश्चिम भागात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.
या कालावधीत पडणारा पाऊस हा सर्वदूर पडणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असे देखील त्यांनी म्हटले आहे. अवकाळी पाऊस हा कधीच सर्व दूर पडत नसतो. भाग बदलत पडत असतो यामुळे शेतकऱ्यांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.
एकंदरीत 29 एप्रिल पर्यंत राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी दिला आहे. दुसरीकडे 30 एप्रिल पासून राज्यातील हवामान कोरडे होणार आहे.
तसेच एक मे पासून उन्हाची तीव्रता वाढणार असा अंदाज यावेळी पंजाब रावांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून जे अवकाळी पावसाचे सावट होते ते आता निवळणार आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.