Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे अवकाळी पावसा संदर्भात. खरंतर गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. एकीकडे राज्यातील काही भागात तापमान 43°c पर्यंत पोहोचले आहे, उष्णतेची लाट येत आहे तर दुसरीकडे राज्यातील काही भागात वादळी पाऊस बरसत आहे.
काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाची गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
याशिवाय राज्याच्या विविध भागांमध्ये वादळी वारे आणि पाऊस सुरु आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवस महाराष्ट्रात अशीच परिस्थिती कायम राहणार असा अंदाज दिला आहे.
हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात आणखी आठ दिवस पावसाची शक्यता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, आज 19 एप्रिल 2024 ला पश्चिमी थंड वारे उत्तर भारताच्या सीमावर्ती भागात सक्रिय होणार अशी शक्यता आहे.
तसेच, बंगालाच्या उपसागरात आधीच वाऱ्याची चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे आणि दक्षिण भारतातून तेलंगणापर्यंत वाऱ्याची खंडित स्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर सध्या अरबी समुद्रातून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तथा बंगालच्या उपसागरावरून विदर्भात आद्रता युक्त उष्ण वारे येत आहेत. यामुळे महाराष्ट्रात असह्य उकाडा जाणवत आहे.
एवढेच नाही तर याच हवामान प्रणालीमुळे सध्या राज्यात वादळी पाऊस आणि गारपीटीचे सत्र पाहायला मिळत आहे. दरम्यान आगामी आठ दिवस वादळी पावसाचे राहणार आहेत.
कोकण किनारपट्टीचा भाग वगळता राज्यात बहुतेक ठिकाणी आगामी आठवडाभर मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
आज अर्थातच 19 एप्रिल ला राज्यातील उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात गारपीट होऊ शकतो असे देखील IMD ने आपल्या नवीन अंदाजात म्हटले आहे.