Maharashtra Rain : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. मात्र त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली. यामुळे शेतकरी चिंतातुर होते. मात्र जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचा जोर वाढला.
राज्यात कोकण, मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस झाला आहे. काल देखील अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी पाहायला मिळाली. सातारा तसेच नाशिक जिल्ह्यातही काल सर्व दूर पाऊस पाहायला मिळाला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातील काही भागात शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांना याचा फटका बसला असून अनेक भागात जमिनी खरडून निघाल्या आहेत.
मात्र, काही भागात अजूनही अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. परंतु जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये अधिक पाऊस झाला आहे. काही भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात पाऊसमान कसा राहणार याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.
खरतर जुलैमध्ये महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं, जुलै मध्ये पावसाचा अनेक भागात कहर पाहायला मिळाला. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. अनेक धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा तयार झाला असून राज्यातील काही प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात आला आहे.
मात्र असे असले तरी ऑगस्ट महिन्यात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील दोन आठवडे पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे.
पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज असल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. IMD ने शुक्रवारपासूनच म्हणजे आजपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की एक जून ते 27 जुलै दरम्यान राज्यात सरासरीपेक्षा १३ टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच जुलैमध्ये चांगला पाऊस झाला आहे. परंतु आता ऑगस्टमध्ये पाऊस उघडीप घेणार अशी शक्यता आहे.