Maharashtra Rain Update : राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या तीन विभागात अजूनही समाधानकारक मोसमी पाऊस पडलेला नाही. यामुळे खरिपातील पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्या भागात पेरण्या झाल्या आहेत तेथील पिके पावसाअभावी करपू लागली आहेत. अशा परिस्थितीत सर्वत्र जोरदार पावसाची आतुरता लागून आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून पावसाबाबत एक महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. हवामान विभागाने आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच आज राज्यातील जवळपास 23 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता IMD कडून वर्तवण्यात आली आहे.
कोकणात आणि घाटमाथ्यावर पावसाची तीव्रता वाढेल असा अंदाज आहे. कोकणातील दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.
IMD ने सांगितल्याप्रमाणे राज्यात पावसाचा जोर वाढवण्यासाठी पोषक हवामान तयार होत आहे. यामुळे आज चार जुलै रोजी दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मात्र हलका पाऊस पडणार असा अंदाज आहे. आता आपण हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे याबाबत जाणून घेऊया.
कोणत्या जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस
आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच ठाणे आणि पुणे या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यात देखील येलो अलर्ट जारी झाला आहे.