Maharashtra Rain : गेल्या बारा दिवसांपूर्वी राज्यात जोरदार पाऊस झाला होता. गेल्या महिन्यात पावसाने अक्षरशा थैमान माजवले होते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पाऊस झाला होता. विशेषतः कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा या जोरदार पावसामुळे विशेष प्रभावीत झाला होता.
या भागातील बहुतांशी ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला होता आणि परिणामी त्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. गेल्या महिन्यात पुरामुळे विदर्भातील जवळपास 40 ते 50 गावांचा संपर्क तुटला होता. कोकणात देखील अनेक नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत होत्या.
काही नद्यांना पूर आला होता. यामुळे नदीकाठी वसलेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला होता. पण गेल्या महिन्यात सर्वत्र त्राहीमाम माजवणारा हा पाऊस गेल्या दोन आठवड्यांपासून शांत बसला आहे.
राज्यात गेल्या दोन आठवड्यात कोणत्याच भागात मुसळधार पाऊस झालेला नाही. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, नासिक, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे मराठवाडा आणि विदर्भात गेल्या महिन्यात चांगला पाऊस पडला होता. मात्र आता पावसाने उघडीप दिली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अशातच मात्र भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून पावसाचे पुन्हा एकदा आगमन होणार असा अंदाज नुकताच वर्तवण्यात आला आहे. येत्या आठवड्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार असा अंदाज आहे.
यामुळे महाराष्ट्रातील सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळणार असून खरीप हंगामातील पिकांना नवीन जीवदान मिळेल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.
राज्यातील कोणत्या भागात पडणार मुसळधार?
भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 24 ऑगस्टदरम्यान मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि संलग्न मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार आहे. या कालावधीत वरूणराजाची या संबंधित भागावर कृपादृष्टी राहणार असल्याने येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार अशी आशा आहे.
एवढेच नाही तर 25 ते 31 ऑगस्टदरम्यान राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडेल असा अंदाज आहे. या कालावधीत राज्यातील कोकण, विदर्भ तर महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश, ओडिसा, छत्तीसगड या भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे.
मात्र या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरी इतका किंवा त्यापेक्षा कमी पाऊस पडेल अशी शक्यता आहे. म्हणजेच या कालावधीमध्ये पडणारा पाऊस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात फार मोठा राहणार नसल्याचे सांगितले जात आहे. पण विदर्भातील नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोल्यासह इतर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता आहे.
तर मराठवाड्यातील संभाजीनगरपासून नांदेडपर्यंत पडणारा पाऊस हा सरासरी इतका किंवा त्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप असल्याने हा पाऊस वनव्यामध्ये गारव्यासारखा अनुभव देणारा राहणार आहे.