Maharashtra Rain : जून महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा मोठा खंड पाहायला मिळाला. 11 जूनला राज्यात मान्सून पोहोचला आणि त्यानंतर राज्यात मौसमी पाऊस सुरू झाला. मात्र राज्यातील कोकण आणि घाटमाथा वगळता जून महिन्यात कुठेच समाधानकारक पाऊस पाहायला मिळाला नाही.
जुलै महिन्याची सुरुवात मात्र जोरदार झाली. एक जुलैपासून ते सहा-सात जुलै पर्यंत राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी लागली. मात्र गेल्या एक-दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. आजही राज्यातील काही भाग वगळता उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडणार असा अंदाज आहे.
आज कोकण आणि घाटमाथ्यावर देखील पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज आयएमडीने आपल्या निवेदनात व्यक्त केला आहे. मात्र असे असले तरी कोकणातील दक्षिण भागात आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या संबंधित विभागात पावसाची शक्यता लक्षात घेता आयएमडीच्या माध्यमातून संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देखील जारी झाला आहे.
कोणत्या जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस
IMD ने दिलेल्या महत्वपूर्ण माहितीनुसार, आज सोमवार 10 जुलै रोजी राज्याच्या दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. दक्षिण कोकणातील या दोन्ही जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय आज विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ चंद्रपूर, गडचिरोली या 11 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीने या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट जारी केला आहे.
उर्वरित राज्यात मात्र तुरळक ठिकाणी हलक्या पावसांच्या सऱ्या बरसतील असा अंदाज आहे. एकंदरीत आज राज्यातील काही भागातून पावसाचा जोर ओसरणार आहे. पावसाचा जोर कमी होणार यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे.