ऐन गणपतीच्या सणाला लालपरी राहणार बंद ! ‘या’ तारखेपासून राज्यात एसटी धावणार नाही, कारण काय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra St News : येत्या दहा दिवसात राज्यात गणेशोत्सवाचा पर्व सुरू होणार आहे. 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. दरवर्षी या सणाला राज्यभर आनंदाचे वातावरण असते. पुणे मुंबई सारख्या शहरात वास्तव्यास असलेले नागरिक गणेशोत्सवाला गावाकडे जातात.

गणेशोत्सवात नेहमीच प्रवाशांची गर्दी राहते. रेल्वे तसेच बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी राहते. दरम्यान गणेशोत्सवापूर्वीच गणेश भक्तांसाठी एक थोडीशी चिंताजनक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गणेशोत्सवापूर्वीच राज्यातील एसटी बस बंद होणार आहे.

सातवा वेतन आयोग लागू करणे व अन्य प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलन पुकारणार आहेत. एस टी महामंडळातील कर्मचारी आता बेमुदत उपोषणावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार युनियनने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 11 सप्टेंबरपासून राजधानी मुंबईत आणि 13 सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसातच राज्यात एसटी बंद राहणार असे सांगितले जात आहे.

खरंतर 2021 मध्ये देखील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या आपल्या मुख्य मागणीसाठी आंदोलन पुकारले होते. 2021 मध्ये पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपामुळे एसटी महामंडळ आणि शासन चांगलेच अडचणीत सापडले होते.

त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा महिने संप पुकारला होता. त्यावेळी राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी मागणी मान्य केल्या होत्या. मात्र मागण्या मान्य झाल्यात तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कर्मचारी नाराज आहेत. यामुळे पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आता बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

यामुळे पुन्हा एकदा लालपरिची चाके स्टेरिंग धरणाऱ्या हाताअभावी थांबणार की काय? अशी भीती सर्वसामान्यांमध्ये आहे. दरम्यान काल शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना आता 38 टक्के एवढा महागाई भत्ता देण्यात आला आहे.

मात्र सध्या राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के एवढा महागाई भत्ता मिळत आहे. यामुळे सदर महागाई भत्ता वाढ झाल्यानंतरही संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये अपेक्षित उत्साह पाहायला मिळत नाहीये. अशातच एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या या संघटनेने पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

11 सप्टेंबर पासून मुंबई येथील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू होईल आणि त्यानंतर 13 सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यभर जिल्हास्तरावर बेमुदत उपोषण केले जाईल असे संघटनेने यावेळी स्पष्ट केले आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो असे बोलले जात आहे.

Leave a Comment