Maharashtra State Employee : सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय सनई चौघडे वाजत आहेत. दुसरीकडे सध्या लग्नसराईचा हंगाम देखील सुरू आहे यामुळे ज्यांच्या रेशीमगाठी जुळल्या आहेत त्यांचे लग्न कार्य देखील धामधूडाक्यात सुरू आहे.
अशातच मात्र राज्यातील अंगणवाडी सेविकांचा पगार रखडला असल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील जवळपास दोन लाखाहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च 2024 चा पगार मिळालेला नाही.
यामुळे ऐन लग्नसराई आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये सदर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र लिहून या सदर महिला कर्मचाऱ्यांचा तातडीने पगार केला पाहिजे अशी मागणी केली आहे.
एका आकडेवारीनुसार आपल्या महाराष्ट्रात जवळपास एक लाख अंगणवाड्या आहेत. यात दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत.
खरे तर अंगणवाडी सेविकांना आणि मदतनिसांना खूपच कमी मानधन दिले जात असल्याची ओरड केली जात आहे.
दुसरीकडे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मार्च महिन्याचे वेतनच रखडले आहे. म्हणजे पगार कमी तर आहेच शिवाय जें मिळतंय ते वेतनही वेळेवर मिळत नाही अशी शोकांतिका पाहायला मिळतं आहे.
यामुळे मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरोधात कमालीचा रोष पाहायला मिळत आहे. ऐन सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या हंगामात मार्च महिन्याचे वेतन रखडले आणि याचा या सदर कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले असल्याने यावर लवकरच कारवाई होईल आणि सदर महिला कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर वेतन दिले जाईल अशी आशा व्यक्त होत आहे.