महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात फुलवली सफरचंदाची बाग ! 8 गुंठ्यातच कमावले 6 लाख, सरासरी 130 रुपये प्रति किलो दराने केली सफरचंद विक्री, वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Successful Farmer : सातारा जिल्ह्यातील मान या दुष्काळी तालुक्यात एका प्रयोगशील शेतकऱ्याने चक्क सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे. खरंतर गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सुलतानी दडपशाहीमुळे शेती व्यवसाय संकटात आला आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमधून अनेकदा अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. जर समजा शेतकऱ्यांना नशिबाने साथ दिली आणि निसर्ग सोबतीशी राहिला आणि शेतीमधून चांगले उत्पादन मिळाले तर उत्पादित झालेल्या मालाला अनेकदा बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी भरडला जात आहे.

पण तरीही काळ्या मातीशी इमान राखत शेतकरी आजही अपयशाची परवा न करता शेतीत राबतोय. शेतीत राब-राब राबून बळीराजा नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून अन संकटांशी दोन हात करत चांगले उत्पन्न कमवत आहेत. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मौजे टाकेवाडी येथील जालंदर दडस यांनीही शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले आहेत.

दडस यांनी सफरचंद लागवड देखील केली आहे. दडस यांनी आयटीआयचे शिक्षण घेतले असून आयटीआय कंप्लिट केल्यानंतर काही काळ नोकरी केली. मात्र इलेक्ट्रिशनच्या नोकरीत त्यांचं मन रमत नव्हतं. यामुळे त्यांनी नोकरीला रामराम ठोकत शेतीत राबण्याचा निश्चय केला.

शेतीमध्ये सुरुवातीपासूनच नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांना जिल्हा परिषदेची आणि कृषी विभागाची देखील मोलाची साथ मिळाली. ठिबक, विहीर, शेडनेट आणि गांडूळ खत प्रकल्पासाठी त्यांना अनुदान मिळाले. या विविध बाबींसाठी मिळालेल्या अनुदानामुळे त्यांना शेती व्यवसायात मदत झाली.

दडस यांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला त्यांनी आठ गुंठ्यात सफरचंद लागवडीचा प्रयोग केला. सिडलिंग राफ्टिंग या तंत्रज्ञानाने सफरचंद लागवड करण्यात आली. लागवड केल्यानंतर साधारणतः तीन वर्षांनी यातून त्यांना उत्पादन मिळाले. आठ गुंठ्यात चारशे ते पाचशे किलो अर्थातच चार ते पाच क्विंटल उत्पादन त्यांना मिळाले.

त्यावेळी सफरचंदला 130 रुपये प्रति किलो असा दर मिळाला होता. त्यातून त्यांना जवळपास साडेपाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळाले. प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या या लागवडीतून लाखोंची कमाई झाल्याने त्यांनी सफरचंद लागवडीचे क्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला. यानुसार त्यांनी 30 गुंठे जमिनीत सफरचंद बाग फुलवली.

यातील 13 गुंठ्यात हॉलंड आणि इटली मधून मागवलेले एम 9, एम 7, एम 111 या जातींच्या सफरचंदाची लागवड केली. तसेच उर्वरित जमिनीवर अण्णा, हरमन, डोरस्ट आणि गोल्डन या जातीची लागवड त्यांनी केली. यंदाच्या वर्षी त्यांनी लागवड केलेल्या सर्वच्या सर्व म्हणजेच 800 झाडांना फळ धारणा होणार आहे.

यामुळे उत्पादनात वाढ होणार असून कमाई मध्ये देखील मोठी वाढ होण्याची त्यांना आशा आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी आठ गुंठे शेत जमिनीवर आता सफरचंद रोपांची नर्सरी देखील सुरू केली आहे. निश्चितच दुष्काळी पट्ट्यात केलेला हा प्रयोग इतरांसाठी देखील मार्गदर्शक राहणार आहे यात शंकाच नाही.

Leave a Comment