Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पावसाची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात विविध भागात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. वास्तविक या चालू सप्टेंबर महिन्यात पहिल्या पंधरवड्यात अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. सात तारखेला जरूर राज्यात पावसाचा जोर वाढला होता मात्र सात ते नऊ या तीन दिवसांच्या काळातच राज्यात चांगला पाऊस झाला आहे.
पहिल्या पंधरवड्यातील उर्वरित दिवस राज्यात पाऊस झालाच नाही. यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. अशातच मात्र गेल्या 24 तासात राज्यातील काही भागात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा थोडासा दिलासा मिळत असल्याचे सांगितले जात आहे.
तहानलेल्या महाराष्ट्राला खरंतर आता मोठ्या पावसाची गरज आहे. मोठा पाऊस झाला तेव्हाच ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून निघेल नाही तर यावर्षी कोरडा दुष्काळ सहन करावा लागेल असे मत व्यक्त होत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून पावसाबाबत महत्त्वाचा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने येत्या काही तासात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात मुंबई ठाणे पालघर नवी मुंबई सह राज्यातील विविध जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे.
आता आगामी तीन ते चार तासात राज्यातील पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने याचा परिणाम म्हणून मराठवाड्यात शनिवार पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर शनिवारी आणि रविवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, येत्या 3 ते 4 तासांत नंदुरबार, धुळे, नाशिक, नांदेड, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्याची देखील शक्यता आहे.
याशिवाय येत्या तीन ते चार तासात जळगाव तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर देखील चांगला पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरतो का आणि राज्यात चांगला पाऊस होतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.