Maharashtra Weather Update : गेल्या जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यातही समाधानकारक पाऊस पडेल अशी भोळीभाबडी अशा शेतकऱ्यांना लागून होती. परंतु ऑगस्ट महिन्यात अगदी सुरुवातीपासूनच पावसाने उघडीप दिली आहे.
शिवाय आता संपूर्ण ऑगस्ट महिना संपला आहे तरीदेखील राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. याचे कारण म्हणजे मान्सूनचे तीन महिने उलटले आहेत. जून, जुलै आणि ऑगस्ट महिना संपला आहे.
आता मान्सून केवळ एक महिना शिल्लक राहिला आहे. यापैकी जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात मात्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला होता. काही ठिकाणी तर ओढे नाले वाहिले आणि पूरस्थिती निर्माण झाली होती.
पण ऑगस्ट महिन्यात राज्यातील काही भागात तब्बल 26 दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. यामुळे खरीपातील पिके संकटात सापडली आहेत. सोयाबीन, कापूस, तूर, मका ही सर्व पिके वाया जातील अशी भीती शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सध्या आभाळाकडे नजरा आहेत.
मात्र वरूणराजा सध्या बरसण्याच्या मूडमध्ये नसल्याचे चित्र तयार होत आहे. कारण की, भारतीय हवामान विभागाने पुढील पाच ते सहा दिवस राज्यात फक्त हलका पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला आहे. अर्थातच राज्यात पाच ते सहा सप्टेंबर पर्यंत हलक्या पावसाच्याच सऱ्या पाहायला मिळू शकतात.
विदर्भात मात्र मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आगामी पाच ते सहा दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडणार तर विदर्भात विजांचा कडकडाट अन मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकंदरीत शेतकऱ्यांची मोठ्या पावसाची आशा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील पूर्ण होणार नसल्याचे दिसत आहे.