Maharashtra Weather Update : हवामान खात्याने परतीच्या पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे. खरंतर यंदा महाराष्ट्राच्या वेशीत मान्सूनचे उशिराने आगमन झाले होते. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मान्सून सर्वदूर पसरला होता.
साधारणतः 11 जूनच्या आसपास संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहोचतो, यंदा मात्र 25 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर मानसूनने आपले पाय पसरवले होते. अर्थातच जवळपास पंधरा दिवस उशिराने मान्सून महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचला होता. याचा परिणाम म्हणून या वर्षी जून महिन्यात महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस झाला.
जुलै महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाला. पण ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा खंड पाडला होता. दरम्यान, गेल्या सप्टेंबर महिन्यात राज्यात पुन्हा एकदा चांगला पाऊस झाला आहे. मात्र असे असले तरी गेल्या महिन्यातील पाऊस हा ऑगस्ट महिन्याची पावसाची दूर भरून काढण्यास अक्षम आहे.
यामुळे अजूनही महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमीच पावसाची नोंद झालेली आहे. यामुळे राज्यातील काही भागांमध्ये भीषण पाण्याचे संकट पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे यामुळे राज्यातील बहुतांशी धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढला आहे यात शंका नाही.
परंतु ज्या भागात गेल्या महिन्यात चांगला पाऊस झालेला नाही तेथील शेतकरी चिंतेत आहेत. अशातच आता हवामान खात्याने महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरत असल्याचे जाहीर केले आहे. IMD ने सांगितल्याप्रमाणे, काल अर्थातच 6 ऑक्टोबर 2023 रोजी शुक्रवारी नागपूर, पुणे आणि मुंबई या तीन प्रमुख शहरांमधून मान्सून माघारी फिरला आहे.
विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांच्या काळात राज्यातील जवळपास 45 टक्के भागातून मान्सून निघून गेला आहे. तसेच हवामान खात्याने येत्या दोन-तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून निघून जाईल असे जाहीर केले आहे. दरम्यान राज्यात आगामी दोन दिवसामध्ये काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण महाराष्ट्र, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे तीन ते चार दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मात्र हवामान खात्याने हवामान कोरडे राहणार असल्याचे सांगितले आहे.