Maharashtra Weather Update : येत्या दोन दिवसात देशात दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. अशातच मात्र देशातील हवामानात मोठा चेंज पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस बरसत आहे. देशातील दक्षिण भागात अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होत आहे.
दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू यांसारख्या राज्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची सुद्धा हजेरी लागत आहे. आपल्या राज्यातही काही भागांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे.
राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात सध्या पाऊस सुरू आहे. विशेष म्हणजे हवामान खात्याने आगामी काही दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीची सुरुवात पावसातच होणार आहे हे जवळपास स्पष्ट झाले. हवामान खात्याला दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
या कमी दाबक्षेत्रामुळे सध्या महाराष्ट्रातील दक्षिण भागात पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांना थोडासा अडचणींचा सामना करावा लागत असला तरी देखील हा अवकाळी पाऊस रब्बी हंगामातील पिकांसाठी थोडा दिलासा देणारा ठरू शकतो असे मत व्यक्त होऊ लागले आहे. खरंतर अवकाळी पाऊस हा शेती पिकांसाठी घातक असतो.
पण यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे मान्सून काळात समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे अनेक भागात विहिरीच्या पाण्याने तळ गाठला आहे. शेततळ्यांमध्ये पाणी शिल्लक नाहीये. यामुळे बहुवार्षिक पीके आणि फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांना आता अवकाळी पावसाची गरज भासू लागली आहे.
त्यामुळे भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली असल्याने राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने आगामी दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कोकणातील आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या पाच जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. IMD ने म्हटल्याप्रमाणे, दक्षिण तामिळनाडूमध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता तयार होत आहे. आपल्या राज्याव्यतिरिक्त गोव्यासह तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही सध्या जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे.
आठ आणि नऊ नोव्हेंबर रोजी राजस्थान आणि पंजाब मध्येही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच दहा तारखेपर्यंत दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशात मुसलधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळ आणि माहेमध्ये 8 नोव्हेंबरपर्यंत, तर तामिळनाडू आणि कराईकलमध्ये 10 नोव्हेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशाराही IMD कडून देण्यात आला आहे.
सोबतच आंध्र प्रदेश, केरळ, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. एकंदरीत पुढील पाच दिवस महाराष्ट्रासहित देशातील काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.