महाराष्ट्रात पारा घसरला अन गारवा वाढला; आता राज्यात पावसाची शक्यता आहे का ? हवामान खात्याने स्पष्टच सांगितलं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील हवामानात गेल्या दोन दिवसात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. हवामानातील हा चेंज मात्र नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. खरंतर गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यातील कमाल तापमान नागरिकांसाठी खूपच त्रासदायक ठरत होते.

ऑक्टोबर हिट मुळे अंगाची अक्षरशः लाहीलाही होत होती. राज्यातील जनता वाढत्या तापमानामुळे घामाघुम झाली होती. पण गेल्या दोन दिवसात राज्यातील पारा घसरला आहे. यामुळे नागरिकांना आता ऑक्टोबर हिट पासून दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. राज्यातील तापमान गेल्या दोन दिवसांत कमालीचे कमी झाले आहे.

यामुळे आता राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसात राज्यातील पहाटेचे तापमान मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. यामुळे वातावरणात गारवा तयार होत असून याचा परिणाम म्हणून आता थंडी पडू लागली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात आता बोचरी थंडी पडायला लागली आहे. मात्र असे असले तरी दिवसाचे कमाल तापमान अजूनही सरासरी एवढेच आहे. परंतु येत्या काही दिवसात थंडीची तीव्रता वाढणार असल्याने कमाल तापमानात देखील घट येईल अशी माहिती हवामान तज्ञांनी दिली आहे.

तसेच महाराष्ट्रातच थंडीचा जोर नोव्हेंबर महिन्यातच वाढेल असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. अशातच मात्र देशातील विविध राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये पाऊस झाला आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये जोरदार पावसाची हजेरी लागली आहे.

काही भागात अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे पाऊस पडला आहे. नुकतेच अरबी समुद्रात तेज चक्रीवादळ तयार झाले होते. अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाले यामुळे महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये पाऊस पडेल अशी शक्यता होती. शिवाय, यावर्षी मानसून काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याने आणि परतीचा पाऊस देखील महाराष्ट्रात मनसोक्त बरसला नसल्याने शेतकऱ्यांची पाऊस पडावा अशी इच्छा होती.

मात्र चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रात पाहायला मिळाला नाही. याशिवाय बंगालच्या खाडीत देखील एक चक्रीवादळ तयार झाले आहे. परंतु याचा देखील आपल्या महाराष्ट्रावर परिणाम होणार नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. यंदा राज्यात सरासरीपेक्षा 12% कमी पावसाची नोंद झाली आहे.

परतीचा पाऊस देखील महाराष्ट्रात फारसा पडलेला नाही. राज्यातील बहुतांशी तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील जवळपास 40 तालुक्यांमध्ये शासनाकडून दुष्काळ जाहीर केला जाऊ शकतो. प्रत्यक्षात मात्र यापेक्षा अधिक तालुके दुष्काळाच्या छायेत पाहायला मिळत आहेत.

परंतु निकषात बसत नसल्याने राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला जाईल अशी माहिती समोर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी रब्बी हंगामासाठी आणि गुराढोरांच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी अवकाळी पाऊस का होईना पण पाऊस पडला पाहिजे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु हवामान खात्याने नजीकच्या काळात महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता अजूनच वाढणार आहे.

Leave a Comment