Maharashtra Weather Update : भारतीय हवामान खात्याने गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे जाहीर केले होते. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे 25 सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थान मधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला.
त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील विविध भागांमधून मान्सून माघारी फिरला आहे. आतापर्यंत देशातील बहुतांशी भागांमधून मान्सून ने काढता पाय घेतला आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यातील जवळपास सर्वच भागातून मान्सून परतला आहे. यामुळे अचानक राज्यात तापमान कमालीचे वाढले आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.
ऑक्टोबर हिटचा सर्वत्र वाईट अनुभव येत आहे. यामुळे सर्वसामान्य जनता आता पावसाळा संपला हिवाळा केव्हा सुरू होणार, जोरदार थंडीला किंवा सुरुवात होणार असा सवाल उपस्थित करत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात आगामी काही दिवस कसं हवामान राहणार याबाबत महत्त्वाची माहिती सार्वजनिक केली आहे.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात तापमान 35 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचणार आहे. विदर्भ विभागातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, धाराशीव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
या जिल्ह्यांमध्ये काही भागात तापमान 35 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते असे आयएमडीने नमूद केले आहे. तर दुसरीकडे कोकणातील विशेषतः दक्षिण कोकणातील म्हणजेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तापमान स्थिर राहणार आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हळूहळू तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तापमानात झालेली ही विक्रमी वाढ आगामी काही दिवस कायम राहणार आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेला आगामी काही दिवस उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत तापमानातील ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
यानंतर मात्र तापमानात हळूहळू घसरण होणार आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच राज्यातील तापमानात बऱ्यापैकी घसरण होईल आणि तेथून मग खऱ्या अर्थाने थंडीला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
एकूणच काय की नोव्हेंबर महिन्यात खऱ्या अर्थाने हिवाळ्याला सुरुवात होणार आहे. यामुळे आगामी काही दिवस राज्यातील जनतेला ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र तयार होत आहे.