Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड पाहायला मिळत आहे. जून महिन्यात म्हणजेच मान्सूनच्या पहिल्या महिन्यात पावसाने दांडी मारली होती. संपूर्ण जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. जुलै महिन्यात मात्र जोरदार पाऊस झाला आणि जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली.
गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाला असल्याने आता ऑगस्ट महिन्यात देखील चांगला पाऊस होईल आणि हा हंगाम चांगला जाईल अशी भोळी भाबडी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र शेतकऱ्यांच्या आशेवर पावसाने पाणी फेरले आहे. पावसाने या चालू ऑगस्ट महिन्यात दांडी मारली आहे.
पावसाच्या खंडामुळे शेती पिके मात्र करपू लागली आहेत. खरंतर महाराष्ट्रातील बहुतांशी भागात शेती ही पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची सोय उपलब्ध नाही त्या शेतकऱ्यांची शेती पिके मरू लागली आहेत. यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अशातच भारतीय हवामान विभागाने पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात आणखी किती दिवस पावसाची उघडीप राहणार, राज्यात मुसळधार पावसाला केव्हा सुरुवात होणार याबाबत हवामान विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे सध्या राज्यात हलका पाऊस पडत आहे.
राज्यातील मुंबईसह कोकण आणि विदर्भातील काही भागात तसेच पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर रिमझिम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. मात्र महाराष्ट्राला जोरदार पावसासाठी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे.
म्हणजेच 15 सप्टेंबर नंतर राज्यात मोठ्या पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असल्याचा अंदाज आहे. येत्या पंधरवड्यात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार होत नसल्याने या कालावधीत सरासरी पेक्षाही कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मोठा पाऊस पडेल असे सांगितले जात आहे.
पुढील सात दिवसात राज्यातील बहुतांशी भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र कोकणातील काही भागात हलका तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असे हवामान विभागाने यावेळी नमूद केले आहे. एकंदरीत जोरदार पावसासाठी सप्टेंबर महिन्यातही शेतकऱ्यांना बराच काळ वाट पाहावी लागणार आहे.
जवळपास सप्टेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा उलटल्यानंतरच राज्यात चांगला पाऊस पडणार असे सांगितले जात आहे. भारतीय हवामान खात्याचे प्रमुख डॉक्टर अनुपमा कश्यपी यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे. कश्यपी यांनी राज्यात पुढील दोन आठवडे चांगला पाऊस होणार नाही असे स्पष्ट केले आहे. म्हणजेच दोन आठवड्यानंतर चांगला पाऊस होऊ शकतो.