Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात जुलै महिन्यात जोरदार बरसणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात चांगलीच विश्रांती घेतली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत आहे. पण या संपूर्ण पावसाळी काळात अपेक्षित असा पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची गरज आहे.
गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पावसाने दडी मारली असल्याने आता खरीप हंगामातील पिके करपू लागली आहेत. राज्यातील काही भागात जुलै महिन्यात देखील फारसा पाऊस झालेला नाही म्हणून तिथे परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की, पेरणी झालेली असली तरी देखील पिकांची अपेक्षित अशी वाढ पहायला मिळत नाहीये.
एकंदरीत हा संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. उर्वरित पावसाळी काळात पाऊस पडणार की नाही, एकंदरीत हवामानाची कशी परिस्थिती राहणार? याबाबत स्पष्टच सांगितले आहे.
काय म्हणताय हवामान तज्ञ
खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात आणखी पंधरा दिवस मोठ्या पावसासाठी पोषक परिस्थिती नाहीये. पुढील पंधरा दिवस राजधानी मुंबई सह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाची शक्यता राहणार आहे.
मात्र उर्वरित महाराष्ट्रात पुढील पंधरा दिवस म्हणजेच सात सप्टेंबर पर्यंत केवळ किरकोळ पावसाव्यतिरिक्त ढगाळ वातावरणाची शक्यताच अधिक जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. 7 सप्टेंबरपर्यंत मुंबई आणि कोकणात जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असे देखील खुळे यांनी यावेळी नमूद केले आहे.
दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात सात सप्टेंबर नंतर ही मोठा पाऊस पडतो की नाही हे त्यावेळीच वातावरणातील बदलांवर अवलंबून राहणार असे त्यांनी म्हटले आहे. खरंतर जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात एलनिनो सुप्त अवस्थेत होता. शिवाय आयओडी म्हणजेच इंडियन ओशियन डायपोल तटस्थ होता. अर्थातच पाऊस पडण्यासाठी या दोन्ही मान्सूनवर परिणाम करणाऱ्या घटकांचा फारसा अडथळा नव्हता. पण तरीही राज्यात पाऊस झाला नाही.
अशा परिस्थितीत आता एलनिनो तीव्र बनत चालला आहे. याचा प्रभाव म्हणून आता कमीच पाऊस पडणार अशी शक्यता आहे. यामुळे आता राजस्थान मधून माघारी फिरणाऱ्या परतीच्या पावसाकडून आणि सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाकडून काय अपेक्षा ठेवावी ? मान्सून काळात तीन महिने फारशी विपरीत परिस्थिती नसतानाही पाऊस पडला नाही आता सप्टेंबर सहित उर्वरित दीड महिना पावसासाठी काय अपेक्षा ठेवावी? असे माणिकराव खुळे यांनी सांगितले.
त्यांनी पावसाबाबतची खंत बोलून दाखवली. एकंदरीत आता मोठा पाऊस बरसणार की नाही हे सांगता येणं कठीण आहे. निश्चितच यंदाच्या मान्सून मधील पावसाचा हा लहरीपणा बळीराजासाठी खूपच मारक ठरत आहे. शिवाय आता मान्सूनच्या उर्वरित दीड महिन्यात पावसासाठी फारशी पोषक परिस्थिती तयार होत नाहीय, यामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार अशी शक्यता आहे .