Maharashtra Wheat Farming : सध्या देशात सर्वत्र खरीप हंगामातील कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. विविध भागात खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे. सोयाबीन, कापूस यांसारख्या पिकांची काढणी प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे काही भागात सोयाबीन आणि कापूस पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण झाली असून नवीन माल बाजारात विक्रीसाठी देखील दाखल झाला आहे.
मात्र सध्या सोयाबीन आणि कापसाला खूपच कमी दर मिळत आहे. हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत. यामुळे आता शेतकरी बांधवांचा सर्व मदार आगामी रब्बी हंगामावर राहणार आहे. येत्या रब्बी हंगामातुन चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी बांधव कंबर कसणार आहेत.
यंदा रब्बी हंगामामध्ये गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्रासाठी शिफारशीत करण्यात आलेल्या गव्हाच्या काही प्रमुख जाती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्रासाठी गव्हाच्या शिफारशीत जाती कोणत्या?
फुले समाधान (एनआयएडब्ल्यू १९९४) : ही महाराष्ट्रासाठी शिफारशीत करण्यात आलेली राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली एक प्रमुख जात आहे. या वाणाची राज्यभर लागवड केली जाऊ शकते. विशेष बाब अशी की बागायती भागात वेळेवर आणि उशिरा पेरणीसाठी हा वाण उपयुक्त ठरत आहे.
वेळेवर पेरणी केली तर 46 क्विंटल प्रति हेक्टरट आणि उशिरा पेरणी केली तर 44 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन या जातीपासून मिळू शकते असा दावा तज्ञांच्या माध्यमातून केला जात आहे. विशेष म्हणजे हा वाण तांबेरा रोगास आणि मावा किडीस प्रतिकारक आहे. हा वाण इतर सामान्य जातीच्या तुलनेत नऊ ते दहा दिवस अगोदर परीपक्व होतो.
फुले सात्त्विक (एन.आय.ए.डब्ल्यू.३१७०) : राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेला हा एक आणखी एक सुधारित वाण आहे. या वाणाची देखील राज्यभर लागवड केली जाऊ शकते. शेतकऱ्यांमध्ये हा वाण अलीकडे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय बनला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हा देखील तांबेरा रोगास प्रतिकारक आहे.
या जातीपासून जवळपास 35 ते 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दाबा तज्ञ लोकांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. एकंदरीत उत्पादनाच्या बाबतीत फुले सात्विक हा वाण फुले समाधान या वाणापेक्षा थोडासा कमकुवत आहे.
एनआयडीडब्ल्यू -११४ : हा जिरायती आणि बागायती अशा दोन्ही सिंचन परिस्थितीमध्ये उपयुक्त ठरतो. राज्यातील हवामान या जातीला मानवते. या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते.
पेरणीनंतर सरासरी 110 ते 115 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनते. हा वाण सुद्धा तांबेरा रोगास प्रतिकारक असल्याचे सांगितले जाते. या जातीपासूनही 35 ते 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.