Maize Farming : मका हे भारतात उत्पादित होणारे एक मुख्य तृणधान्य पीक आहे. या पिकाची संपूर्ण देशभरात कमी अधिक प्रमाणात लागवड केली जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील मका लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.
या पिकाची प्रामुख्याने खरीप हंगामात लागवड होते. सध्या मका पिकाची पेरणी केली जात आहे. राज्यातील बहुतांशी भागात मका लागवडीसाठी शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळत आहे.
खरंतर, मका हे एक प्रमुख तृणधान्य पीक आहे, शिवाय गेल्या दोन-तीन वर्षांपासून मक्याला चांगला बाजार भाव मिळत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे पोल्ट्री उद्योगात मक्याची मागणी वाढली आहे. यामुळे मका पिकाची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते असे मत व्यक्त होत आहे.
मात्र असे असले तरी मक्याचे चांगले उत्पादन मिळवण्यासाठी त्याच्या सुधारित वाणाची लागवड करण्याचा सल्ला दिला जात आहे. दरम्यान आज आपण मका पिकाच्या सुधारित जातींची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मक्याच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
राजर्षी : मक्याचा हा एक सुधारित आणि संकरीत वाण आहे. या वाणाची राज्यभर लागवड केली जाते. हा एक मध्यम कालावधीत तयार होणारा वाण आहे. या वाणाची खरीप आणि रब्बी हंगामात लागवड केली जाते. खरीप हंगामात हे वाण 70 ते 75 दिवसात आणि रब्बी हंगामात 90 ते 100 दिवसात परिपक्व होते. या जातीचे मक्याचे दाणे नारंगी पिवळ्या रंगाचे असतात. हा वाण करपा आणि खोडकिडीस प्रतिकारक असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
बायो 9737 : हा एक संकरित वाण असून खरीप हंगामासाठी शिफारशीत आहे. हा वाण 90 ते 100 दिवसात परिपक्व बनतो. या जातीचे दाणे नारंगी रंगाचे असतात. या जातीपासून 70 ते 75 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
फुले महर्षी : मध्यम कालावधीमध्ये परिपक्व होणारे हे एक मक्याचे संकरित आणि सुधारित वाण आहे. या जातीचे पीक 90 ते 100 दिवसात उत्पादित होते. हा वाण खरीप हंगामात उत्पादित करण्यासाठी शिफारशीत करण्यात आला आहे. या जातीपासून 75 ते 80 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.