Mhada News : प्रत्येकाचे आपले स्वतःचे हक्काचे एक घर असावे असे स्वप्न असते. या स्वप्नांसाठी आपण सर्वजण दिवस-रात्र मेहनत करत असतो. मात्र वाढती महागाई हे स्वप्न सहजतेने पूर्ण होऊ देत नाही. अहोरात्र काबाडकष्ट करूनही अनेकांना आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करता येत नाही, ही वास्तविकता आहे.
याचे कारण म्हणजे घरांच्या किमती. अशा परिस्थितीत मात्र सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येते ते म्हणजे म्हाडा. म्हाडा राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरांची उपलब्धता करून देत असते.
यामुळे अनेकांच्या नजरा म्हाडाच्या लॉटरीकडे लागलेल्या असतात. अशाच म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी कामाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हाडाने मोठी गुड न्यूज दिली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हाडा पुणे मंडळाने एक सोडत काढली आहे.
दरम्यान म्हाडाने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर याच सोडतीबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे. खरेतर, या सोडतीसाठी गेल्या महिन्यात अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.
आठ मार्च 2024 ला या घरांसाठीच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आणि आठ एप्रिल पर्यंत याला मुदत देण्यात आली होती. पण, नागरिकांच्या माध्यमातून अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला मुदतवाढ दिली गेली पाहिजे अशी मागणी केली जात होती.
दरम्यान याच मागणीच्या पार्श्वभूमीवर म्हाडा पुणे मंडळाने सकारात्मक असा निर्णय घेत या अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला मुदत वाढ दिली आहे. एवढेच नाही तर या लॉटरीमध्ये समाविष्ट असलेल्या घरांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील घरांची संख्या 100 ने वाढवली आहे. तसेच या सोडतीसाठी अर्ज करण्याला 30 मे 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या लॉटरीत एकूण 4877 घरांचा समावेश करण्यात आलेला आहे.
यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेत 2416 सदनिका, म्हाडाच्या विविध योजनेतील 18 सदनिका, म्हाडा पीएम आवास योजना ५९ सदनिका, पंतप्रधान आवास (पीएमएवाय) खासगी भागीदारी योजना (पीपीपी) ९७८ सदनिका, २० टक्के योजना पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड येथे १४०६ सदनिकांचा समावेश आहे.
निश्चितच, म्हाडा पुणे मंडळाने अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला मुदतवाढ दिली असल्याने आणि या लॉटरीत आणखी शंभर घरे ऍड केली असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून हजारो नागरिकांचे घर निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात खरे उतरणार आहे.