Milk Rate Maharashtra : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र गेल्या काही वर्षांपासून विविध संघटनांचा सामना करावा लागत आहे.
यात पशुखाद्यांच्या किमतीत झालेली वाढ, इंधनाच्या दरात झालेली वाढ, लंपी सारख्या महाभयंकर आजाराचा प्रादुर्भाव इत्यादी अनेक कारणांमुळे पशुपालन व्यवसाय तोट्याचा सिद्ध होत आहे. विशेष बाब म्हणजे पशुखाद्याच्या आणि इंधनाच्या दरात वाढ होत असली तरीही दुधाच्या दरात घसरण होत आहे.
यामुळे सहाजिकच पशुपालन व्यवसायात उत्पादन खर्च अधिक आणि उत्पादन कमी अशी परिस्थिती आता पहावयास मिळत आहे. शिवाय उन्हाळ्याच्या दिवसात पशुच्या दूध उत्पादन क्षमतेत घट येते. यामुळे, आता दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी परवडत नसल्याचे चित्र आहे. यामुळे दुधाला अधिक दर देण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दुधाच्या प्रश्नावर लक्ष वेधले असून त्यांचे एक विधान सध्या मोठ्या चर्चेत आले आहे. खरंतर इंदापूरला नुकताच रयत क्रांती संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला आहे. तालुक्यातील वरकुटे बुद्रुक या ठिकाणी हा शेतकरी मेळावा भरला होता. यात माजी मंत्री सदाभाऊ खोत देखील हजर होते.
यामध्ये माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी एका लिटर दुधाला देशी दारूच्या एका कॉटरला जेवढा दर मिळतो तेवढा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यांनी गाईच्या दुधाला प्रति लिटरला 75 रुपये भाव मिळाला पाहिजे अशी मागणी केली असून तर म्हशीच्या दुधाला सव्वाशे रुपये प्रति लिटर भाव मिळाला पाहिजे असे यावेळी सांगितले आहे.
तसेच यामुळे महागाई वगैरे काही वाढत नाही उलट शेतकऱ्याला जर भाव दिला तर महागाई निश्चित कमी होईल. कारण महागाईची ज्यांना झळ पोहचते ती माणसं शेतीवरती काम करायला येतात. शेतकरी मग त्यांना दोन पैसे देतो असे सदाभाऊ खोत यांनी यावेळी म्हटले आहे. एकंदरीत देशी दारूच्या कॉटरला जेवढा भाव मिळतोय तेवढा भाव दुधाला देण्याची मागणी सदाभाऊ खोत यांनी केली असल्याने सध्या खोत यांचे हे विधान सबंध महाराष्ट्रात चर्चेचे ठरत आहे.