Millet Farming : गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा तयार झाला आहे. यामुळे संकटात सापडलेली खरीप हंगामातील पिके पुन्हा एकदा उभारी घेत आहेत. खरिपातील पिकांना नवीन संजीवनी मिळाली आहे.
खरंतर खरीप हंगामामध्ये शेतकरी बांधव विविध पिकांची लागवड करतात. सोयाबीन, मका, कापूस या समवेतच बाजरी, तुर यांसारख्या अनेक पिकांची लागवड खरीप हंगामामध्ये केली जाते. बाजरी हे खरीप हंगामामध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याशिवाय या पिकाची रब्बी हंगामातही शेती केली जाते.
पण गेल्या काही वर्षांमध्ये बाजरी लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे. मात्र केंद्र शासनाने भरड धान्याला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याने आणि वैश्विक पातळीवर भरड धान्याला मागणी वाढली असल्याने आगामी काळात बाजरी लागवडीखालील क्षेत्र वाढणार असा आशावाद व्यक्त होत आहे.
भरड धान्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म पाहता आता ग्रामीण भागासमवेतच शहरी भागातही भरडधान्यांना मागणी वाढली आहे. यामध्ये बाजरीची देखील मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत भविष्यात बाजरीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
खरंतर बाजरीची लागवड खरीप हंगामात जून ते जुलै या काळात होते आणि रब्बी हंगामात ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान केली जाते. दरम्यान आज आपण बाजरीच्या काही सुधारित आणि प्रगत जातींविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण बाजरीच्या अशा काही वाणांविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्या अल्पकालावधीत परिपक्व होतात आणि चांगले उत्पादन देण्यास सक्षम आहेत.
बाजरीच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
Mh 169 : बाजरीची ही एक प्रगत आणि सुधारित जात आहे. या वाणाची लागवड देशातील बहुतांशी राज्यांमध्ये केली जाते. ही एक मध्यम कालावधीत परिपक्व होणारी जात आहे. ही जात पेरणी केल्यानंतर साधारणता 80 ते 85 दिवसात परिपक्व होते. या जातीपासून 20 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर एवढे उत्पादन मिळते.
RHB 173 : बाजरीचा हा एक सुधारित वाण आहे. या वाणाच्या पिकाला 49 दिवसानंतर फुलधारणा होण्यास सुरुवात होते. तसेच साधारणतः 79 दिवसात या वाणाचे पीक परिपक्व बनते. या जातीपासून 31 क्विंटल प्रति हेक्टर एवढे धान्याचे उत्पादन मिळते आणि प्रति हेक्टर 78 क्विंटल पर्यंत चाऱ्याचे उत्पादन मिळते. निश्चितच हा वाण पशुपालक शेतकऱ्यांसाठी तसेच धान्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या वाणाची लागवड दुहेरी उद्देशाने होत असल्याने शेतकऱ्यांना यातून दुहेरी फायदा होतो.
ICMH 356 : या जातीची पेरणी केल्यानंतर साधारणता 75 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनते. या जातीचे उत्पादन मात्र खूपच कमी आहे. या जातीपासून साधारणता 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत चे उत्पादन मिळते. या जातीपासून चाऱ्याचे देखील चांगले उत्पादन मिळते. या जातीचा कडबा हा जनावरांसाठी खूपच फायदेशीर ठरतो. यामुळे या वाणाची लागवड प्रामुख्याने पशुपालन करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात.
RHB 223 : बाजरीची ही एक प्रगत जात म्हणून ओळखली जाते. या जातीची पेरणी केल्यानंतर साधारणतः 70 दिवसात पीक परिपक्व बनते. म्हणजेच हा एक अल्पकाळामध्ये परिपक्व होणारा बाजरीचा सुधारित वाण आहे. या जातीचे बाजरीचे पीक दुष्काळ सहन करण्यास सक्षम आहे. म्हणजे दुष्काळी भागात या वाणाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. दुष्काळी परिस्थिती असल्यास या वाणातून चांगले उत्पादन मिळते. या जातीपासून साधारणता 28 ते 30 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते.