Monsoon 2024 : गेल्या वर्षी मानसून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर 2023 या काळात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला. महाराष्ट्रात गेल्यावर्षी झालेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा 12% कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. राज्यातील अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.
अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आत्तापासूनच वणवण करावी लागत आहे. खरे तर भारतीय शेती ही सर्वस्वी मान्सूनवर अवलंबून आहे. यामुळे गेल्या मान्सून काळात कमी पाऊस झाला असल्याने याचा फटका शेती क्षेत्राला बसला आहे.
शेतकऱ्यांना शेतीमधून फारसे उत्पादन मिळवता आलेले नाही. कमी पावसामुळे खरीप आणि रब्बी असे दोन्ही हंगाम प्रभावित झाले आहेत. दरम्यान गेल्या मान्सूनवर एलनिनोच संकट होतं असं तज्ञांनी स्पष्ट केल आहे.
तसेच मध्यंतरी प्रसारमाध्यमांमध्ये आगामी मान्सूनवर अर्थातच 2024 मध्ये येणाऱ्या मान्सूनवर सुपर एलनिनोच संकट राहणार अशा चर्चा पाहायला मिळाल्या होत्या. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या माध्यमातून 2024 मध्ये मान्सून कसा राहणार याबाबत सातत्याने विचारणा केली जात आहे.
अशातच नुकत्याच दोन ते तीन दिवसांपूर्वी अमेरिकेन हवामान संस्था नोआने येत्या दोन महिन्यात प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव ओसरणार असे मत व्यक्त केले आहे. याचा परिणाम म्हणून भारतात यावर्षीच्या मान्सून काळात चांगला पाऊस बरसेल असे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे नोआ या संस्थेच्या पाठोपाठ हवामान अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट या खाजगी संस्थेने देखील मान्सून 2024 बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. स्कायमेट या संस्थेने म्हटल्याप्रमाणे एल निनोचा प्रभाव एप्रिल अखेर पर्यंत संपणार आहे.
यामुळे यंदाचा उन्हाळा कडक राहील, पण मान्सून 2024 मध्ये म्हणजेच जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत चांगला पाऊस बरसणार अशी आशा आहे.
यावर्षी चांगला पावसाळा राहील असा आशावाद स्कायमेट या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने व्यक्त केला असल्याने राज्यासहित संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे मान्सून 2024 मध्ये 96 ते 104% म्हणजेच सरासरी पेक्षा जास्तीच्या पावसाची हजेरी लागेल असे देखील स्कायमेटने म्हटले आहे.
एकूणच काय की, सरासरी पेक्षा जास्त पाऊस बरसणार असल्याने महाराष्ट्र सहित देशातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंद वार्ता राहणार आहे. एक तर गेल्या वर्षी मान्सून काळात चांगला पाऊस झाला नसल्याने देशातील अनेक भागात पाण्याचे संकट तयार झाले आहे.
अशा स्थितीत जगातील प्रमुख हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी यंदा मान्सून काळात चांगला पाऊस बरसणार असा अंदाज दिला असल्याने ही बातमी सर्वसामान्यांसाठी देखील मोठी दिलासादायी राहणार आहे.