Monsoon 2024 : सध्या महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी पावसाचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची आणि गारपीटीची नोंद करण्यात आली आहे. एकंदरीत महाराष्ट्रात ऊन, पावसाचा खेळ सुरू आहे.
दरम्यान आता मान्सूनकडे देखील नजरा लागल्या आहेत. यंदाचा मानसून कसा राहणार ? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. दरम्यान, मान्सून 2024 बाबत अनेक जागतिक हवामान संस्थांनी आणि देशातील काही हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी अंदाज जाहीर केला आहे.
सध्या राज्यासह देशात पूर्व मौसमी पाऊस सुरू आहे. मात्र आता लवकरच देशात मोसमी पावसाला सुरुवात होणार आहे. दरवर्षी मानसून जूनच्या पहिल्या आठवड्यात आपल्या राज्यात दाखल होत असतो. सात जूनला मानसून तळ कोकणात येतो. गेल्यावर्षी मात्र मान्सून आपल्या महाराष्ट्रात खूपच उशिराने दाखल झाला होता.
पण, यंदा मान्सून वेळे आधीच दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. दुसरीकडे स्कायमेट वेदर या संस्थेने यावर्षी मान्सून सामान्य राहणार असे म्हटले आहे. तथापि, अजून भारतीय हवामान खात्याचा मान्सूनबाबतचा अंदाज समोर आलेला नाही.
त्यामुळे जेव्हा हवामान खात्याचा अधिकृत अंदाज जाहीर होईल तेव्हाच मान्सूनसंदर्भात अधिक माहिती मिळू शकणार आहे. पण, हवामान तज्ञांनी हिंद महासागरातील द्विध्रुव म्हणजे इंडियन ओशियन डायपोल सकारात्मक राहणार असल्याने आणि ला नीना मुळे यंदा मान्सून लवकर येणार, असे सांगितले आहे.
या घटना देशात जोरदार मान्सूनचा आधार तयार करत असल्याचेही बोलले जात आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मान्सून त्याच्या नेहमीच्या वेळेआधीच दाखल होणार असा अंदाज तज्ञांनी दिलेला आहे. ला निना आणि आयओडीचे एकत्र येणे ही एक अनोखी घटना मानली जात आहे.
याचा नैऋत्य मान्सूनवर लक्षणीय परिणाम होईल, असा अंदाज आहे. पॅसिफिकमधील ला नीनाच्या बरोबरीने अनेक हवामान मॉडेल हिंदी महासागरातील एक चांगला IOD टप्पा दर्शवत आहेत. यामुळे यंदा मान्सून काळात चांगला पाऊस होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.
स्कायमेंट काय म्हणतंय ?
यंदाचा मान्सून हा सामान्य राहणार असे स्कायमेंटने सांगितले आहे. यंदा पावसाळी काळात म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये 868.6 मिमी दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (एलपीए) 102 टक्के (5 टक्के त्रुटी) एवढा राहणार असे अपेक्षित आहे.
LPA च्या 96 टक्के ते 104 टक्के पाऊस हा सामान्य मानला जातो. म्हणजे यंदा सामान्य पावसाची शक्यता आहे. यंदा पावसाळ्यात दक्षिण, पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भागात बऱ्यापैकी पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आगामी मान्सून काळात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील मुख्य मान्सूनच्या पावसावर अवलंबून असलेल्या भागात पुरेसा पाऊस राहणार आहे. तथापि, बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या पूर्वेकडील राज्यांमध्ये जुलै आणि ऑगस्टच्या सर्वोच्च मान्सून महिन्यांत कमी पाऊस पडू शकतो असे या संस्थेने म्हटले आहे.