Monsoon 2024 : मान्सून हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा घटक आहे. मान्सून चांगला झाला तर भारताच्या अर्थव्यवस्थेत तेजी येते. याचे कारण म्हणजे भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे आणि भारतीय शेती हे सर्वस्वी मान्सूनवर आधारित आहे. गेल्या वर्षी मात्र याच मान्सूनने शेतकऱ्यांसोबत मोठा दगा-फटका केला होता.
जून ते सप्टेंबर 2023 या चार महिन्यांच्या मान्सून काळात सरासरीपेक्षा कमी पावसाची हजेरी लागली. यामुळे संपूर्ण खरिप हंगाम आणि रब्बी हंगाम प्रभावीत झाला आहे. कमी पावसामुळे आत्तापासूनच राज्यातील अनेक धरणांनी आणि विहिरींनी तळ गाठला आहे.
यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून आगामी काळात पिण्याच्या पाण्यासाठी देखील तारेवरची कसरत करावी लागू शकते अशी भीती व्यक्त होत आहे. अशा या विपरीत परिस्थितीत आता साऱ्यांचे लक्ष आगामी मान्सूनकडे लागले आहे.
2024 मध्ये पावसाळा कसा राहणार ? हाच प्रश्न बळीराजा उपस्थित करत आहे. विशेष म्हणजे या प्रश्नाचे उत्तर देखील आता हळूहळू पुढे येऊ लागले आहे. अनेक जागतिक हवामान संस्थांनी 2024 मध्ये पावसाळा कसा राहणार ? याबाबत आत्तापासूनच अंदाज वर्तवायला सुरुवात केली आहे.
खरेतर, गेल्या वर्षी जागतिक हवामान संस्थांनी एलनिनोमुळे भारतासहित आशिया खंडातील अनेक देशांमध्ये कमी पाऊस होणार, तसेच काही ठिकाणी दुष्काळ पडणार अशी भविष्यवाणी केली होती. विशेष म्हणजे काही अंशी ही भविष्यवाणी खरी देखील ठरली आहे.
यामुळे आता शेतकऱ्यांचे जागतिक हवामान संस्थांनी आगामी 2024 च्या मान्सून बाबत काय माहिती दिली आहे, काय अंदाज वर्तवला आहे याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अशातच नोआ अमेरिकन हवामान संस्थेने 2024 च्या मान्सून बाबतचा आपला सुधारित अंदाज जाहीर केला आहे.
04 मार्च 2024 ला या हवामान संस्थेने एप्रिल महिन्याच्या अखेरीस एल निनोचा प्रभाव कमी होणार असा सुधारित अंदाज जारी केला आहे. याआधी देखील या संस्थेने असेच म्हटले होते.
दरम्यान मार्च महिन्याच्या सुधारित हवामान अंदाजात देखील या संस्थेने एलनिनो एप्रिल महिन्याच्या अखेरीस काढता पाय घेणार अशी भविष्यवाणी केली आहे. दरम्यान जर या हवामान संस्थेचा हा अंदाज खरा ठरला तर यंदाच्या पावसाळ्यात चांगला समाधानकारक पाऊस पडेल अशी आशा व्यक्त होत आहे.
त्यामुळे यंदा संपूर्ण भारतात चांगला पावसाळा राहील असा अंदाज तज्ञांकडून दिला जात आहे. या संस्थेने असे म्हटले आहे की, प्रशांत महासागरात सध्या कार्यरत असलेला अल-निनोचा प्रभाव एप्रिलच्या शेवटीपर्यंत 79 टक्क्यापर्यंत कमी झालेला पाहायला मिळू शकतो.
तसेच त्यापुढील जूनपर्यंतच्या काळात तो पूर्णतः नाहीसा होईल. असे झाल्यास यंदाच्या पावसाळ्यात अल-निनोचे संकट नसेल आणि साहजिकच यामुळे 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये मॉन्सूनचा पाऊस हा अधिक बरसणार असा अंदाज आहे.