Monsoon News : मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या जनतेसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या संपूर्ण देशभर आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शेतीकामांनी वेग पकडला आहे. राज्यात देखील पूर्व मशागतीसाठी आणि बी बियाणे तथा खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.
दरम्यान काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक देखील घेतली आहे. एकंदरीत सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या बांधापासून ते मंत्र्यांच्या एसी ऑफिस पर्यंत सगळीकडे मान्सूनची चर्चा आहे. सर्वजण मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. अशातच मात्र मान्सून बाबत एक थोडीशी चिंता वाढवणारी बातमी आहे.
ती म्हणजे मोसमी वाऱ्याचा प्रवास हा मंदावला आहे. परंतु याचा मान्सून आगमनावर फारसा परिणाम होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनी मोसमी वाऱ्यांचा वेग काहीसा मंदावला असल्याचे म्हटले आहे.
तसेच यामुळे जून महिन्यात उत्तर भारतातील राज्यांना उष्णतेच्या लाटांचा फटका बसणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान याच संदर्भात भारतीय हवामान खात्याच्या तज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावरील बाष्प बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या दिशेने फेकले गेले आहे यामुळे मौसमी वाऱ्याची बंगाल शाखेची आगेकूच काहीशी मंदावली असल्याचे म्हटले आहे.
मस्करीन बेटावरून येणाऱ्या नैऋत्य मौसमी वाऱ्याचा वेग देखील मंदावला आहे. यामुळे मान्सूनचा प्रवास हा थोडासा संथ गतीने सुरू आहे. परंतु असे असले तरी केरळमध्ये मान्सून वेळेतच येणार असे कश्यपी यांनी स्पष्ट केले आहे. माणिकराव खुळे यांनी देखील कश्यपी यांच्याप्रमाणेच मान्सूनचे वेळेत आगमन होणार असे म्हटले आहे.
दरम्यान अरबी समुद्रात देखील कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून हे कमी दापक क्षेत्र आगामी काही तासात त्याचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास अरबी समुद्रातील बाष्प ओमान कडे ढकलले जाण्याची शक्यता आहे.
यामुळे मात्र मान्सूनच्या प्रवासात अडथळा येऊ शकतो. पण सध्या याबाबत ठोस अंदाज देता येणार नाही. यासाठी आणखी दोन-तीन दिवस वाट पहावी लागणार असल्याची माहिती खुळे यांनी दिली आहे. एकंदरीत सध्या स्थितीला जरी मौसमी वाऱ्यांचा वेग मंदावला असला तरी देखील मानसून वेळेतच दाखल होण्याची शक्यता आहे.
मात्र आगामी काळात मोसमी वाऱ्यांच्या प्रवासात काही अडथळा निर्माण झाला तर मान्सूनला थोडासा विलंब होऊ शकतो अशीही शक्यता आहे. यामुळे आता मान्सूनचे आगमन केरळमध्ये कधी होते हे पाहण्यासारखे राहणार आहे.