Mumbai Ayodhya Vande Bharat Train : काल अर्थातच 30 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्राला एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. मुंबई ते जालना या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे.
खरे तर मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक दैनंदिन कामानिमित्त आणि पर्यटनासाठी राजधानी मुंबईत दाखल होत असतात.
विशेष म्हणजे मुंबईतूनही पर्यटनासाठी मराठवाड्यात येणाऱ्यांची संख्या खूप अधिक आहे. अशा परिस्थितीत मराठवाड्यातून मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेस ही हाय स्पीड ट्रेन सुरू झाली पाहिजे अशी मागणी केली जात होती.
दरम्यान या मागणीच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक निर्णय झाला आणि रेल्वे बोर्डाच्या मान्यतेनंतर या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आहे. काल या ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे.
भारतातील ही ट्रेन नियमितपणे एक जानेवारी 2024 पासूनच धावणार आहे. म्हणजेच आज ही ट्रेन धावणार नाही. नवीन वर्षातच मुंबई ते जालना या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ने सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
दरम्यान, नव्याने सुरू झालेल्या या एक्सप्रेस ट्रेनच्या स्वागतावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई ते अयोध्या दरम्यान देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे याबाबत मागणी केली आहे. तसेच मुंबई ते जालना या मार्गावर ही गाडी सुरू केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानलेत.
ही गाडी सुरू झाल्यानंतर राज्यातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या सातवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे राज्यात आणि मुंबईला मिळालेली ही पाचवी वंदे भारत आहे.
आता मुंबईहून मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव आणि मुंबई ते जालना या मार्गावर ही गाडी धावत आहे.