Mumbai Goa Vande Bharat Express : बहुचर्चित आणि बहूप्रतिक्षित मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला गेल्या महिन्यात म्हणजेच जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. 27 जून रोजी मोदी यांनी भोपाळ येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
विशेष बाब अशी की, त्या दिवशी एकूण पाच वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. दरम्यान मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव रेल्वे स्थानकादरम्यान सुरू झालेल्या या ट्रेनमुळे मुंबई ते गोवा हा प्रवास अधिक गतिमान झाला आहे. ही ट्रेन कोकणातून जात असल्याने याचा कोकणवासीयांना सर्वाधिक फायदा होत आहे.
ही ट्रेन सुरू झाल्यापासून कोकणातील प्रवाशांना या ट्रेनला एवढे प्रेम दिले आहे की ही गाडी हाउसफुल होत आहे. मुंबई ते गोवा हे अंतर या वंदे भारत ट्रेनने अवघ्या आठ तासात गाठता येणार आहे, पण सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यात या गाडीला हे अंतर पार करण्यासाठी दहा तासांचा वेळ लागत आहे.
परंतु पावसाळ्यात देखील या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास करण्यासाठी इतर गाड्यांच्या तुलनेत या गाडीला दोन ते तीन तासांचा कमी वेळ लागतो. हेच कारण आहे की, पावसाळा असतानाही या गाडीला प्रवाशांच्या माध्यमातून चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. अशातच मात्र रेल्वेच्या माध्यमातून मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे.
काय आहे निर्णय?
खरंतर, मुंबई ते गोवा अंतर खूपच लांब आहे. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र हा लांबचा प्रवास आहे आणि सलग दहा तास बसून प्रवाशांना प्रवास करावा लागतो म्हणून अनेक प्रवाशांना याचा त्रास होत आहे. अशा परिस्थितीत या ट्रेनमध्ये लवकरच बदल केला जाणार आहे.
या मार्गावर आता वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर कोच चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. अर्थातच आता या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसने झोपून प्रवास करता येणार आहे. वंदे भारतमधील आसन श्रेणीमुळे प्रवाशांचा 10 तासांचा प्रवास कंटाळवाणा होत आहे.
त्यामुळे लवकरच वंदे भारतमधील आसन श्रेणीत बदल करून शयनयान डबे जोडण्यात येणार आहेत. याबाबत रेल्वे मंडळाकडून नियोजन सुरू आहे. मध्य रेल्वेने याबाबत माहिती देताना सांगितले की, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत एक्स्प्रेसला स्लीपर कोच डबे जोडण्याची घोषणा केली आहे.
रेल्वे त्यासंबंधी नियोजन आखत आहे. एकूणच काय की, आगामी काही महिन्यात मुंबई – गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला स्लीपर कोच जोडले जाणार आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास हा जलद आणि आरामदायी होणार आहे. प्रवाशांसाठी रेल्वेचा हा निर्णय निश्चितच फायद्याचा ठरणार यात शंकाच नाही.