Mumbai Goa Vande Bharat Express : मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी बातमी आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली हाय स्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन भारतीय रेल्वेच्या ताफ्यात 2019 मध्ये आली आहे. तेव्हापासून आतापर्यंत देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले आहे.
यापैकी सात मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील मुंबई ते गोवा, मुंबई ते जालना, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपुर आणि नागपूर ते इंदोर या मार्गांवर या गाडीचे संचालन यशस्वीरीत्या सुरू आहे.
विशेष म्हणजे या मार्गांवरील वंदे भारत ट्रेनला प्रवाशांनी अभूतपूर्व प्रतिसाद देखील दाखवला आहे. दरम्यान याच 7 मार्गांवरील मुंबई ते गोवा या वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार केला जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
खरंतर रेल्वेने मंगळूर ते मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली आहे. मात्र या एक्सप्रेसला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाहीये.
त्यामुळे रेल्वेची डोकेदुखी वाढली असून मंगळूर ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेस बंद करून त्याऐवजी मुंबई ते मडगाव दरम्यान सुरू असलेली म्हणजेच मुंबई ते गोवा दरम्यान सुरू असलेली वंदे भारत एक्सप्रेस मंगळुर पर्यंत चालवण्याचा प्लॅन आखला जात आहे.
परंतु कोकण विकास समितीने याला जोरदार विरोध दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर समितीच्या माध्यमातून रेल्वेमंत्री आणि कोकण रेल्वे प्रशासनाला निवेदन सुद्धा देण्यात आले आहे. सध्या स्थितीला सुरू असलेल्या मुंबई ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या ट्रेनचा कोकणातील रेल्वे प्रवाशांना सर्वाधिक लाभ मिळत आहे. ही ट्रेन सध्या आठ डब्यांची आहे मात्र या ट्रेनला वाढता प्रतिसाद पाहता डब्यांची संख्या 16 पर्यंत वाढवली गेली पाहिजे अशी मागणी आहे.
दरम्यान मुंबई ते मडगाव दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार मंगळूरूपर्यंत करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र असे झाले तर कोकणातील रेल्वे प्रवाशांना पुरेसा आरक्षण कोटा मिळणार नाही.
त्यामुळे कोकणातील रेल्वे प्रवाशांची अडचण होऊ शकते. यामुळे मंगळूर ते मडगाव दरम्यानची वंदे भारत एक्सप्रेस मुंबई पर्यंत विस्तारली गेली पाहिजे आणि मुंबई ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेस जिथे थांबत नाही तिथे तिला थांबा दिला गेला पाहिजे अशी मागणी केली जात आहे.
यामुळे मुंबई ते गोवा आणि मुंबई ते मंगळूर अशी स्वातंत्र वंदे भारत एक्सप्रेस धावू शकेल आणि यामुळे प्रवाशांना फायदा होईल असे बोलले जात आहे. तथापि, याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून आणि रेल्वे कडून काय निर्णय घेतला जातो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.