Mumbai News : दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईत एक ऐतिहासिक घटना घडली. गेली बारा वर्षे मेट्रोसाठी वनवास भोगणाऱ्या नवी मुंबईकरांना शुक्रवारी अर्थातच 17 नोव्हेंबर 2023 रोजी मेट्रोची भेट मिळाली आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये मोठे समाधान पाहायला मिळत आहे.
खरंतर शहरात सिडकोच्या माध्यमातून चार Metro मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. सिडकोने नवी मुंबई मध्ये मेट्रोची पायाभरणी सुमारे बारा वर्षांपूर्वी केली होती. बेलापूर ते बेंधार या नवी मुंबईमधील पहिल्या मेट्रो मार्गाची पायाभरणी झाली, पण हा मार्ग नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकला नाही.
अवघा अकरा किलोमीटर लांबीचा हा मार्ग अकरा वर्षांपेक्षा अधिक काळासाठी प्रलंबित राहिला. आणखी काही वर्षे हा मार्ग सुरू झाला नसता तर प्रभू श्रीरामांच्या वनवासाचा 14 वर्षाचा कालावधी देखील या मार्गाने पूर्ण केला असता.
मात्र, आता हा नवी मुंबईमधील पहिला-वहिला मेट्रोमार्ग सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आला आहे. 17 नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता या मार्गावर सर्वप्रथम मेट्रो धावली आहे.
तसेच कालपासून अर्थातच 18 नोव्हेंबर पासून सकाळी सहा ते रात्री 10 या कालावधीत दर पंधरा मिनिटांच्या अंतराने या मार्गावर मेट्रो चालवली जात आहे. यामुळे शहरातील नागरिकांचा प्रवास गतिमान होणार आहे.
गेली अनेक वर्ष ज्या मेट्रोची वाट पाहिली जात होती त्या गाडीचे स्वप्न प्रत्यक्षात खरे उतरले आहे, परिणामी शहरातील नागरिकांमध्ये मोठे समाधान आहे. पण, या Metro च्या तिकीट दरावरून आता शहरातील नागरिकांमध्ये थोडीशी नाराजी पाहायला मिळत आहे.
खरंतर या मार्गाचा तळोजा येथे कार्यरत असलेल्या कामगारांना मोठा लाभ होणार आहे. या कामगार वर्गाचा प्रवास या निमित्ताने गतिमान होणार आहे. मात्र शहरातील याच कामगार वर्गाला Metro Ticket Rate परवडेनासे आहेत.
म्हणून येथील कामगार वर्गाने, प्रवाशांनी मेट्रोचे तिकीट दर 40 रुपयांवरून कमी करून 20 ते 30 रुपये केले पाहिजेत, अशी मोठी मागणी यावेळी केली आहे. असे झाल्यास सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रवासी देखील मेट्रोने प्रवास करू शकतील, असे त्यांचे मत आहे.
नवी मुंबई मेट्रोने प्रवासासाठी 0 ते 2 किलोमीटरसाठी दहा रुपये, 2 ते 4 किलोमीटरसाठी पंधरा रुपये, 4 ते 6 किलोमीटरसाठी 20 रुपये, 6 ते 8 किलोमीटरसाठी 25 रुपये, 8 ते 10 किलोमीटरसाठी 30 रुपये, 10 किलोमीटरच्या पुढील अंतरासाठी 40 रुपये असे तिकीट दर आकारले जाणार आहे.
पण हे तिकीट दर जास्त आहेत आणि यामध्ये वीस रुपयांपर्यंतची कपात केली पाहिजे अशी मागणी प्रवाशांच्या माध्यमातून उपस्थित केली जात आहे. यामुळे आता या मार्गावरील मेट्रोच्या तिकीट दरात कपात करण्याबाबत काही सकारात्मक निर्णय होईल का हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.