Mumbai Railway News : मुंबईची लाईफ लाईन अर्थातच मुंबई लोकल रेल्वे संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने उद्या मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्लॉकमुळे मुंबई लोकलच्या काही फेऱ्या रद्द राहणार आहेत तर काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मध्य रेल्वेच्या माध्यमातून उद्या 16 जुलै 2023 रोजी माटुंगा ते ठाणे आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. यासोबतच पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून राम मंदिर ते बोरिवली दरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे.
या तीन ठिकाणच्या ब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. खरंतर मुंबई शहरात आणि उपनगरात लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही खूप अधिक आहे. दरम्यान उद्या वीकेंड असल्याने लोकलमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता देखील आहे. अशातच मात्र मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे कडून ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे.
परिणामी या ब्लॉकमुळे विकेंडला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थोड्याशा अडचणींचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान आज आपण या तीन ठिकाणच्या ब्लॉकमुळे कोणत्या लोकल फेऱ्या उशिराने धावणार आहेत आणि कोणत्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, माटुंगा ते ठाणे यादरम्यानच्या अप आणि डाऊन स्लो मार्गावर उद्या सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून 35 मिनिटांपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक धिम्या मार्गावर घेतला जाणारा असल्याने धीम्या मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत आणि काही लोकल फेऱ्या या जवळपास 20 ते 25 मिनिटे उशिरा धावणार आहेत.
हार्बर रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर उद्या सकाळी 11:40 ते दुपारी चार 40 पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे सीएसएमटी / वडाळा रोड ते वाशी / बेलापूर / पनवेल लोकल आणि सीएसएमटी/वडाळा रोड ते गोरेगाव/वांद्रेदरम्यान धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. तसेच या कालावधीत प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी कुर्ला फलाट क्रमांक आठवरून पनवेलसाठी विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेने उद्या राम मंदिर ते बोरिवली दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी दहा वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत ब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉकच्या कालावधीत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत तर काही लोकल फेऱ्या 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावणार आहेत. विशेष बाब अशी की प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी बोरिवली ते गोरेगाव दरम्यान विशेष लोकल सेवा या कालावधीत सुरू केल्या जाणार असल्याची माहिती देखील पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून हाती आली आहे.