Mumbai Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राजधानी मुंबईवरून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत अन यामुळे रेल्वे गाड्या हाउसफुल होत आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेकजण आपल्या मूळ गावी परतत आहेत.
विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्या आहेत यामुळे अनेकांनी ट्रिपचा प्लॅन बनवला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर सध्या रेल्वे मार्गांवर अतिरिक्त गर्दी पाहायला मिळत आहे.
दरम्यान, याच अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेने राजधानी मुंबईवरून आणखी एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते सुभेदार गंज प्रयागराज यादरम्यान उन्हाळी विशेष गाडी चालवणार आहे. या दोन्ही रेल्वे स्थानकादरम्यान या उन्हाळी विशेष गाडीच्या एकूण 22 फेऱ्या होणार आहेत.
यामुळे मुंबईवरून उत्तर प्रदेशला जाणाऱ्यांना तथा उत्तर प्रदेशवरून मुंबईला येणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता आपण या विशेष एक्सप्रेस गाडीचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक?
एलटीटी-सुभेदार गंज साप्ताहिक उन्हाळी विशेष गाडी (ट्रेन क्रमांक ०४११६) लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून 19 एप्रिल ते 28 जून या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजता रवाना होणार आहे आणि तिसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी प्रयागराज येथील सुभेदारगंज रेल्वेस्थानकावर पोहोचणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०४११५ ही विशेष गाडी प्रयागराज येथील सुभेदारगंज Railway Station येथून १८ एप्रिल ते २७ जून दरम्यान प्रत्येक गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी सव्वाचार वाजता मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
मिळालेल्या माहितीनुसार, या विशेष एक्सप्रेस ट्रेनला या रेल्वे मार्गावरील 17 महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, चित्रकुट धाम, बांदा, रागौल, भरवा सुमेरपूर, कानपूर सेंट्रल आणि फतेहपूर या रेल्वे स्थानकावर ही विशेष एक्सप्रेस गाडी थांबणार आहे.