Mumbai Rain News : मुंबईला पावसाचा तडाखा ! २६ जुलै २००५ च्या महाप्रलयाची आठवण ताजी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबईत उशिराने सुरू झालेला पाऊस मागील काही दिवसांपासून दमदार कोसळत आहे. बुधवारी सकाळपासून शहर आणि उपनगरांत गडगडाटासह पावसाने संततधार कोसळत मुंबईकरांना जोरदार तडाखा दिला. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने मुंबईकरांची १८ वर्षांपूर्वीच्या २६ जुलैची आठवण ताजी झाली.

धाकधूक वाढल्याने अनेकांनी घर गाठण्यासाठी घाई केली. सखल भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतूक मंदावली होती. पावसाचा रेल्वे वाहतुकीलाही फटका बसल्याने लोकल उशिराने धावत होत्या. रेल्वे स्थानकावरील प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचे हाल झाले. गुरुवारीही मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा असल्याने पालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

मुंबईत यंदा पावसाने उशिराने हजेरी लावली असली तरी मागील दोन आठवड्यांपासून पावसाने मुंबईसह महाराष्ट्र व्यापला आहे. मुंबईत १० ते १२ दिवसांपासून पावसाने आपली कोसळधार सुरू ठेवली आहे. बुधवारी सकाळपासून दिवसभर गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला.

त्यामुळे अंधेरी सबवे, सायन गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, चेंबूर शेल कॉलनी, दादर टीटी, परळ, मंत्रालय परिसर, गोवंडी, मानखुर्द, धारावी, माहिम, भांडुप, मालाड, गोरेगाव, कांदिवली, वांद्रे आदी सखल भागांत पाणी साचले. मुसळधार पावसाचा इशारा असल्याने महापालिकेने पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंपाची व्यवस्था केली होती. त्यामुळे साचलेल्या पाण्याचा उपसा करून पाण्याचा निचरा करण्यात आला..

पावसाचा जोर वाढत असल्याचे लक्षात आल्यावर काही खासगी कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडले. तसेच पावसामुळे रेल्वे वाहतूक बंद पडल्यास अडकून पडू नये म्हणून घर गाठण्यासाठी धावपळ केली. जोरदार पावसाचा इशारा असल्याने चौपाट्या, समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी होऊ नये, यासाठी पालिकेने चोख सुरक्षा तैनात केली होती.

दुपारनंतर गडगडाटासह पावसाचा जोर वाढला. आकाशात काळे ढग, त्यात मुसळधार पाऊस कोसळल्याने गेल्या २६ जुलै २००५ च्या महाप्रलयाची आठवण ताजी झाली. त्यामुळे मुंबईकरांनी लवकर घर गाठले.

सध्या तलाव क्षेत्रातही समाधानकारक पाऊस कोसळत आहे. त्यामुळे तळ गाठलेल्या तलावांत हळूहळू पाणीसाठा वाढत आहे. तुळशीपाठोपाठ तानसा व विहार तलावही भरून वाहू लागल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गुरुवारीही हवामान विभागाने मुंबईत पावसाचा ऑरेंज अॅलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे हा आठवडाही जोरदार पावसाचा जाणार आहे.

Leave a Comment