Mumbai Solapur Vande Bharat Express : फेब्रुवारी 2023 मध्ये भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली. या गाड्या सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच या गाडीची लोकप्रियता वाढली.
रेल्वे प्रवाशांना या गाडीचा प्रवास चांगलाच भावला. विशेषता मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांनी विशेष पसंती दाखवली आहे. या गाडीमुळे मुंबई-पुणे-सोलापूर हा प्रवास गतिमान होण्यास मदत झाली आहे. या गाडीमुळे पुणेकरांचा मुंबईकडील आणि सोलापूरकडील प्रवास तसेच सोलापूरकरांचा पुणे आणि मुंबईकडील प्रवास गतिमान झाला आहे.
मात्र असे असले तरी या गाडीचे वाढीव तिकीट दर पाहता काही रेल्वे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर देखील पाहायला मिळाला आहे. ही गाडी केवळ उच्चभ्रू समाजासाठी विकसित झाल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला आहे. ही गाडी सामान्य रेल्वे प्रवाशांसाठी नसून श्रीमंतांसाठी आहे असा टोला प्रवासी लगावत आहेत.
शिवाय वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरामुळे प्रवासी संख्या देखील कमी होत आहे. यामुळे भारतीय रेल्वे बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वंदे भारत एक्सप्रेसचे एसी चेअरकारसह सर्व एक्सप्रेस गाड्यांमधील एक्झिक्यूटिव्ह क्लास आणि विस्टा डोम कोच मधील भाडे 25% पर्यंत कमी होणार आहे.
मात्र गेल्या 30 दिवसात ज्या मार्गावर प्रवासी संख्या अर्थातच एक्यूपेन्सी 50% पेक्षा कमी आहे अशाच मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस किंवा इतर एक्सप्रेसच्या तिकीट दरात कपात होणार असल्याचे सांगितले गेले आहे. विशेष म्हणजे संपूर्ण मार्गावर किंवा अंतर्गत स्टेशनमध्ये देखील प्रवासी संख्या कमी असेल तर या निर्णयानुसार त्यासंबंधित स्टेशन मधील प्रवासादरम्यान तिकीट दरात कपात होणार असल्याचा दावा केला जात आहे.
यानुसार, आता पुणे ते सोलापूर आणि सोलापूर ते पुणे या दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरात कपात होऊ शकते असे चित्र तयार होत आहे. खरं पाहता, सोलापूर ते मुंबई आणि मुंबई ते सोलापूर या संपूर्ण वंदे भारत एक्सप्रेस मध्ये 80 टक्के प्रवासी संख्या आहे.
यात पुणे ते मुंबई दरम्यान प्रवासी संख्या अधिक आहे उर्वरित रूटवर प्रवासी संख्या खूपच कमी आहे. अर्थातच संपूर्ण मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरात कपात होणार नसल्याचे चित्र आहे. पण सोलापूर ते पुणे आणि पुणे ते सोलापूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसला कमी प्रतिसाद मिळत आहे. यामुळे या टप्प्यातील तिकीट दर कमी होऊ शकते असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला आहे.
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसची प्रवासी संख्या किती?
सोलापूर-पुणे ‘वंदे भारत’ मध्ये सोलापूर ते मुंबई या मार्गावर २८ टक्के प्रवासी संख्या आहे, सोलापूर ते पुणे २१ टक्के आणि पुणे ते मुंबई ५० टक्के प्रवासी संख्या नमूद करण्यात आली आहे. तसेच मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मुंबई ते सोलापूर २१ टक्के, मुंबई ते पुणे ५५ टक्के आणि पुणे ते सोलापूर १४ टक्के प्रवासी संख्या नमूद केली जात आहे.